महाराष्ट्र सदनात रंगली रांगोळी कार्यशाळा; स्पर्धेत संजू गौतम प्रथम

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात रांगोळी प्रदर्शन, कार्यशाळा आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत संजू गौतम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्राची लोककला दिल्लीकरांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला.

Aug 18, 2026 - 00:13
 0  13
महाराष्ट्र सदनात रंगली रांगोळी कार्यशाळा; स्पर्धेत संजू गौतम प्रथम
महाराष्ट्र सदन रांगोळी, रांगोळी कार्यशाळा दिल्ली, रांगोळी स्पर्धा, संजू गौतम, गायत्री पाटील, प्रतीक पानसरे, गणेश खरे, महाराष्ट्र सदन दिल्ली, महाराष्ट्राची लोककला

प्रतिनिधी  : देवानंद शिंदे 

नवी दिल्ली, दि. १७ : महाराष्ट्र सदन आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या समृद्ध रांगोळी कलेचा सुंदर आविष्कार अनुभवता यावा, यासाठी रांगोळी प्रदर्शन, कार्यशाळा आणि स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या उपक्रमाला राजधानीतील नागरिक, कलाकार, विद्यार्थी आणि कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रांगोळी कार्यशाळेत सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार गायत्री पाटील आणि प्रतीक पानसरे यांनी सहभागी कलाकारांना विविध पारंपरिक तसेच आधुनिक रांगोळी शैलींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. संस्कार भारती, गालिचा, लॅंडस्केप, पोर्ट्रेट आणि पोस्टर रांगोळी यांसारख्या विविध शैलींची रचना, रंगसंगती, प्रमाणबद्धता, रेषांचे नियोजन आणि कलात्मक मांडणी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी ठरली आकर्षण

सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार गणेश खरे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. अत्यंत नेटकेपणाने साकारलेली रचना, प्रभावी रंगसंगती आणि व्यक्तिचित्रणातील जिवंतपणामुळे या कलाकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

उपस्थित नागरिक आणि कलाप्रेमींनी या भव्य रांगोळीचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्राच्या पारंपरिक कलेचा राजधानीत झालेला हा सुंदर आविष्कार उपस्थितांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रांगोळी स्पर्धेलाही कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध संकल्पना आणि कलाशैलींवर आधारित आकर्षक रांगोळ्या स्पर्धकांनी साकारल्या. पारंपरिक रचनांसोबतच निसर्ग, व्यक्तिचित्रे, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांचे कलात्मक सादरीकरण रांगोळीच्या माध्यमातून करण्यात आले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन नागरिकांसाठी दोन दिवस खुले ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या रांगोळी कलेतील वैविध्य आणि कलात्मकता अनुभवण्याची संधी मिळाली.

संजू गौतम प्रथम; माही आणि अनन्या मित्तल द्वितीय

रांगोळी स्पर्धेत श्रीमती संजू गौतम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. माही मित्तल आणि अनन्या मित्तल यांनी द्वितीय क्रमांक मिळविला, तर यशोदा मनुलकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

जया व सुवर्णा तसेच मीना हरणे यांना प्रोत्साहनपर बक्षिसांनी गौरविण्यात आले.

स्पर्धेच्या परीक्षक म्हणून सुप्रिया देवस्थळी, सह महालेखानियंत्रक,

भारत सरकार, रांगोळी कलाकार गणेश खरे आणि फाइन लाइन आर्ट अकादमीचे आशिष देशमुख यांनी काम पाहिले.

रांगोळी ही संस्कृतीचा महत्त्वपूर्ण वारसा – सुप्रिया देवस्थळी

बक्षीस वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना सुप्रिया देवस्थळी यांनी रांगोळी कलेतील प्रमाणबद्धता, रंगसंगती, रेषांचे अचूक नियोजन आणि सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्व अधोरेखित केले.

रांगोळी ही केवळ सजावटीची कला नसून आपल्या संस्कृतीचा महत्त्वपूर्ण वारसा आहे. या कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी तसेच नव्या पिढीला या कलेशी जोडण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राची लोककला देशाच्या राजधानीत पोहोचविण्याचा प्रयत्न

समारोपप्रसंगी निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

रांगोळी ही महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोककला देशाच्या राजधानीत नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे डॉ. सिंघल यांनी सांगितले.

महाराष्ट्र सदन हे दिल्लीतील मराठी बांधवांसाठी ‘होम अवे फ्रॉम होम’ ठरावे, यासाठी विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘फिल्म क्लब’सह महाराष्ट्रीय संस्कृतीचे विविध उपक्रम

सप्टेंबरच्या तिसऱ्या रविवारपासून दर महिन्याला निवडक मराठी चित्रपटाचे प्रदर्शन करणारा ‘फिल्म क्लब’ सुरू करण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती आणि पारंपरिक वस्तूंच्या खरेदीसाठीही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. श्वेता सिंघल यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे सहायक संचालक दीपक कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोलापत्ते, सारिका शेलार यांच्यासह कला क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, विद्यार्थी, कलाप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या पारंपरिक रांगोळी कलेला राजधानी दिल्लीमध्ये व्यासपीठ मिळाले असून, महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि लोककलेचा वारसा देशाच्या विविध भागांमध्ये पोहोचविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.