छत्रपती शिवरायांच्या विचारांवर नवी दिल्लीत राष्ट्रीय चर्चासत्र; २ व ३ सप्टेंबरला जेएनयूमध्ये विविध विषयांवर विचारमंथन
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, प्रशासन व्यवस्था आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांवर नवी दिल्लीत २ व ३ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी: नरेश शिंदे
२ व ३ सप्टेंबरला जेएनयूच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये तज्ज्ञांचे विचारमंथन
नवी दिल्ली, दि. ३१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, प्रशासन व्यवस्था, राष्ट्रनिर्मितीचे विचार आणि मराठा साम्राज्याच्या विविध ऐतिहासिक पैलूंवर सखोल चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीत दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जयिष्णू : सहिष्णू भारताचे रक्षक’ या विषयावर हे चर्चासत्र होणार आहे.
२ व ३ सप्टेंबर २०२६ रोजी जेएनयूच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात इतिहास संशोधक, अभ्यासक, विचारवंत आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा विविध अंगांनी अभ्यास मांडणार आहेत.
युद्ध आणि पराक्रमासोबत प्रशासन व्यवस्थेवरही चर्चा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे केवळ युद्ध आणि पराक्रमाच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यांच्या प्रशासन व्यवस्थेपासून राज्याभिषेकापर्यंत, दक्षिण दिग्विजयापासून मराठा आरमारापर्यंत तसेच संस्कृत साहित्यातील शिवरायांच्या संदर्भांपासून पुढील काळातील दिल्लीवरील मराठ्यांच्या प्रभावापर्यंत विविध विषयांवर चर्चासत्रात विचारमंथन होणार आहे.
या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचा, राज्यकारभाराचा आणि राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पनेचा विविध ऐतिहासिक संदर्भांमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जेएनयूच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन
चर्चासत्राचा उद्घाटन सोहळा २ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री पंडित यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तंजावर घराण्याचे प्रतिनिधी बाबाजी भोसले हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक प्रशांत खेडेकर विशेष अतिथी, तर प्रसिद्ध विचारवंत मुकुल कानिटकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनानंतर खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी ‘एक हजार वर्षांचा हिंदू प्रतिकार’ या विषयावर विचार मांडणार आहेत. त्यानंतर शिवरायांचा राज्याभिषेक व प्रशासन, महाराजांची दक्षिण मोहीम आणि संस्कृत साहित्यातील शिवरायांचे संदर्भ अशा विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
‘शिवराज भूषण’ महानाट्याने पहिल्या दिवसाचा समारोप
चर्चासत्राच्या पहिल्या दिवसाचा समारोप कवी भूषण यांच्या काव्यावर आधारित ‘शिवराज भूषण’ या महानाट्याने करण्यात येणार आहे. शिवचरित्रातील विविध पैलूंचे साहित्यिक आणि सांस्कृतिक दर्शन या माध्यमातून घडणार आहे.
मराठा आरमार आणि दिल्लीवरील मराठ्यांच्या प्रभावावर चर्चा
चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी, ३ सप्टेंबर रोजी शोधनिबंध सादरीकरणासह विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रांमध्ये ‘मराठा आरमार’, औरंगजेबाच्या वेढ्यादरम्यान मराठ्यांनी केलेला संघर्ष तसेच ‘१८ व्या शतकातील दिल्लीवरील मराठ्यांचे वर्चस्व’ या विषयांवर इतिहास संशोधक आणि अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत.
मराठा सामर्थ्याचा विस्तार, तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि दिल्लीच्या राजकारणावर पडलेला मराठ्यांचा प्रभाव या विषयांचा या सत्रांमध्ये अभ्यास केला जाणार आहे.
३ सप्टेंबरला चर्चासत्राचा समारोप
या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.१५ वाजता होणार आहे. जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलिपुडी पंडित समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, ज्येष्ठ विचारवंत प्रदीप रावत आणि प्रा. हिरामण तिवारी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा, प्रशासन कौशल्याचा, राष्ट्रनिर्मितीच्या विचारांचा आणि मराठा सामर्थ्याच्या ऐतिहासिक प्रवासाचा विविध दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे चर्चासत्र इतिहास संशोधक, विद्यार्थी आणि शिवचरित्राच्या अभ्यासकांसाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.