सदर वृत्त मुंबई गुन्हे शाखेच्या दक्षिण सायबर पोलीस ठाण्याने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकावर आधारित असून, संपादकीय आवश्यकतेनुसार वृत्तांकनासाठी तयार करण्यात आले आहे.

मुंबईच्या दक्षिण सायबर पोलीस ठाण्याने कंपनीच्या संचालकाची बनावट व्हॉट्सअॅप ओळख वापरून 10.40 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील सहा आरोपींना महाराष्ट्र, बिहार आणि दिल्लीमधून अटक केली. या प्रकरणात 5.63 कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोठविण्यात आली असून मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे.

Jun 30, 2026 - 22:32
 0  6
सदर वृत्त मुंबई गुन्हे शाखेच्या दक्षिण सायबर पोलीस ठाण्याने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकावर आधारित असून, संपादकीय आवश्यकतेनुसार वृत्तांकनासाठी तयार करण्यात आले आहे.
मुंबई सायबर पोलीस, फेक व्हॉट्सअॅप डीपी, सायबर फसवणूक

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई : कंपनीच्या संचालकाचा (डायरेक्टर) फोटो व्हॉट्सअॅप डीपीवर लावून स्वतःला मालक असल्याचे भासवत एका कंपनीची तब्बल 10 कोटी 40 लाख 71 हजार 924 रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात दक्षिण सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, मुंबईला यश आले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र, बिहार आणि दिल्ली येथून सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, 5 कोटी 63 लाख 98 हजार 191 रुपये गोठविण्यात (होल्ड) यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जून ते 15 जून 2026 या कालावधीत 63 वर्षीय फिर्यादी यांच्या मोबाईलवर कंपनीच्या संचालकाचा फोटो असलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून संदेश आला. आरोपीने स्वतःला कंपनीचा मालक असल्याचे सांगून आपण बैठकीत व्यस्त असल्यामुळे तातडीने विविध बँक खात्यांमध्ये पैसे पाठविण्याचे निर्देश दिले.

फिर्यादी यांनी संदेश खरा समजून कंपनीच्या एचडीएफसी बँक खात्यातून 63 वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे 10.40 कोटी रुपयांहून अधिक रक्कम आरोपींनी दिलेल्या खात्यांमध्ये वर्ग केली. फसवणूक लक्षात आल्यानंतर 16 जून रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान सायबर पोलिसांनी आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीपर्यंत तपासाची व्याप्ती वाढवली. जालना जिल्ह्यातील ज्ञानेश्वर दरेभान ठोके, बिहारमधील बिरेंद्रकुमार चंद्रमा भगत आणि रंजनकुमार राजू खरवार, तसेच दिल्लीतील विकास उपेंद्र बिंद, वंश सुमित मनोचा आणि फैयाज शब्बीर हुसेन आलम यांना अटक करण्यात आली. दिल्लीतील तीन आरोपींना तिहार कारागृहातून ताब्यात घेण्यात आले.

तपासात आरोपींनी फसवणुकीतील पैशातून उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि महाराष्ट्रातील नामांकित ज्वेलर्सकडून सोने खरेदी केल्याचेही निष्पन्न झाले आहे. मुख्य सूत्रधारांसह इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके विविध राज्यांमध्ये रवाना झाली आहेत.

अटक आरोपींकडून दोन स्मार्टफोन, स्टेट बँकेचे पासबुक आणि एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे.

नागरिकांसाठी पोलिसांचे आवाहन

दक्षिण सायबर पोलिसांनी नागरिकांना बनावट व्हॉट्सअॅप डीपी, बनावट शेअर मार्केट अॅप किंवा लिंकवर विश्वास ठेवू नये, आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची खात्री करावी, तसेच कोणतीही व्यक्ती पोलिसांच्या नावाखाली 'डिजिटल अटक' करण्याची धमकी देत असल्यास घाबरू नये, असे आवाहन केले आहे. कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0