फिल्मी स्टाईल पाठलाग करून चेन स्नॅचर जेरबंद; 15 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-1 ने फिल्मी स्टाईल पाठलाग करून एका सराईत चेन स्नॅचरला अटक केली. आरोपीकडून पाच चेन स्नॅचिंग गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून सुमारे 15 लाख रुपये किमतीचे 76 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्पोर्ट्स बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत.

Jun 13, 2026 - 00:43
 0  4
फिल्मी स्टाईल पाठलाग करून चेन स्नॅचर जेरबंद; 15 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
पिंपरी चिंचवड पोलीस, चेन स्नॅचर अटक, गुन्हे शाखा युनिट 1

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड, दि. 12 जून : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-1 ने उल्लेखनीय कामगिरी करत महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या हिसकावणाऱ्या एका सराईत चेन स्नॅचरला फिल्मी स्टाईल पाठलाग करून अटक केली आहे. आरोपीकडून चेन स्नॅचिंगचे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून सुमारे 15 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि दोन स्पोर्ट्स बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत.

3 जून 2026 रोजी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाची सोन्याची चेन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने हिसकावून नेली होती. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-1 ला तपासाची जबाबदारी देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी विविध भागांतील 150 ते 200 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

तपासातून आरोपी तळेगाव दाभाडे, देहूरोड, दापोडी आणि इतर परिसरातही चेन स्नॅचिंग करत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीच्या हालचालींवर पाळत ठेवून पोलिसांनी बाणेर परिसरात सापळा रचला. 7 जून रोजी रात्री आरोपी चेन स्नॅचिंगच्या उद्देशाने बाणेर परिसरात आला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित गोविंद इंगळे (वय 31) असे असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असून सध्या पुणे परिसरात वास्तव्यास आहे.

पोलीस चौकशीत आरोपीने एकट्यानेच चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सांगवी, दापोडी, तळेगाव, देहूरोड आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली. आरोपीकडून 76 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्पोर्ट्स बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस तपासात आरोपीविरुद्ध यापूर्वीही चोरी, दरोडा आणि फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0