मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांची कारवाई; संशयित प्रवाशाच्या तपासणीत सराईत गुन्हेगार जेरबंद, धारदार चाकू जप्त

मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी संशयित प्रवाशाची तपासणी करताना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतले. आरोपीकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह मध्य प्रदेशातील विविध रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

Aug 22, 2026 - 01:51
 0  154
मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांची कारवाई; संशयित प्रवाशाच्या तपासणीत सराईत गुन्हेगार जेरबंद, धारदार चाकू जप्त
मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस, रेल्वे पोलीस, मुंबई रेल्वे पोलीस, दादर रेल्वे स्टेशन, सराईत गुन्हेगार, धारदार चाकू जप्त, संशयित प्रवासी, रेल्वे स्टेशन तपासणी,

मुंबई ब्यूरो: अनिल सावरे 

मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संशयित प्रवासी आणि त्यांच्या सामानाची तपासणी करत असताना मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतले. संशयिताकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे रेल्वे परिसरात संभाव्य अनुचित घटना टाळण्यात पोलिसांना यश आले.

मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संशयित प्रवासी तसेच त्यांच्या सामानाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार रेल्वे स्थानकांवर नियमित तपासणी आणि पोलिसिंग करण्यात येत आहे.

१७ ऑगस्ट २०२६ रोजी दादर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम टर्मिनस परिसरात कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक एम. एस. सोनवणे, पोलीस हवालदार किशोर चांगेदव माने आणि इतर कर्मचारी प्रवाशांची व त्यांच्या सामानाची तपासणी करत होते.

यावेळी दादर-अजमेर एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांपैकी एक संशयित प्रवासी आणि त्याच्या सामानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अजबसिंग मेनवालसिंग ठाकूर, वय ६२ वर्षे, रा. कपराई चौकी, उबाई रोड, पालसिंग, मन्सासिंग, मकान क्रमांक ०३, वडोदरा, गुजरात हा संशयास्पदरीत्या आढळून आला.

पोलिसांनी त्याची अधिक तपासणी केली असता त्याच्या अंगावरील कपड्यांच्या मागील बाजूस तसेच कमरेच्या भागात लपवून ठेवलेला एक धारदार चाकू आढळून आला. पोलिसांनी तात्काळ चाकू जप्त करून संशयिताला ताब्यात घेतले.

जप्त करण्यात आलेला चाकू अंदाजे १५० ग्रॅम वजनाचा असून त्याची लांबी सुमारे ४ x ११ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. चाकूच्या पात्यावर ‘WANTIAN 2665 HI – CARBON WANIAN STAINLESS STEEL’ असा मजकूर लिहिलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. चाकूला बाजूने धार असून टोकदार स्वरूपाचा हा चाकू तपासणीदरम्यान जप्त करण्यात आला.

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास समोर

पोलिसांनी केलेल्या चौकशीत अजबसिंग मेनवालसिंग ठाकूर याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध बांद्रा रेल्वे पोलीस ठाणे, मुंबई तसेच उज्जैन आणि भोपाळ रेल्वे पोलीस ठाणे, मध्य प्रदेश येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

उज्जैन रेल्वे पोलीस ठाण्यातील दोन प्रकरणांमध्ये आरोपीला यापूर्वी अनुक्रमे ७ वर्षे व ५ वर्षे सश्रम कारावास आणि आर्थिक दंडाची शिक्षा झाल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. भोपाळ रेल्वे पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात त्याला १४ वर्षे सश्रम कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा झाल्याची नोंद आहे.

प्रतिबंधात्मक कारवाई

१७ ऑगस्ट रोजी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. १८ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम ३५(३) अन्वये त्याला सूचना पत्र देण्यात आले. भविष्यात त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडू नये यासाठी १९ ऑगस्ट रोजी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

त्यानंतर २० ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई सेंट्रल, मुंबई येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीकडून १० हजार रुपयांचा बंधपत्र/केस बॉण्ड स्वीकारून जामिनावर मुक्तता केली असल्याची माहिती प्रेस नोटमध्ये देण्यात आली आहे.

मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र महादेव काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अशोक लक्ष्मण सोनवणे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी संशयित व्यक्ती आणि त्यांच्या सामानाची तपासणी अधिक प्रभावीपणे करण्यावर मुंबई रेल्वे पोलिसांकडून भर दिला जात असून, या कारवाईमुळे रेल्वे परिसरात संभाव्य गंभीर घटना टाळण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.