खारमधील रेडिओ हॉटेल चोरी प्रकरणाचा अवघ्या १० तासांत छडा; सराईत आरोपी अटकेत, ६.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
मुंबईतील खार पश्चिम येथील रेडिओ हॉटेलमध्ये पहाटे घरफोडी करून ६.८६ लाखांची रोख रक्कम आणि मोबाईल फोन चोरणाऱ्या सराईत आरोपीला खार पोलिसांनी अवघ्या १० तासांत अटक केली. आरोपीकडून ६.३८ लाखांची रोख रक्कम आणि चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून पोलिसांच्या तत्पर तपासामुळे गुन्ह्याचा वेगाने उलगडा झाला.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई : खार पश्चिम येथील लिंकिंग रोडवरील प्रसिद्ध रेडिओ हॉटेलमध्ये पहाटेच्या सुमारास घरफोडी करून लाखो रुपयांची रोकड आणि मोबाईल फोन चोरणाऱ्या सराईत आरोपीला खार पोलिसांनी अवघ्या १० तासांत अटक करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेडिओ हॉटेलचे व्यवस्थापक यश शामसुंदर बांदकर (वय ३२, रा. भांडुप) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० जून २०२६ रोजी पहाटे ५.३० ते ५.५० वाजण्याच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने हॉटेलच्या काचेच्या दरवाजाच्या वरून आत प्रवेश केला. त्यानंतर कॅश काउंटरमधील ६ लाख ८१ हजार रुपये रोख रक्कम आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक नेमण्यात आले. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान आरोपी पवई येथील फिल्टर पाडा परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जाहिदअली रोशन अली कुरेशी उर्फ 'मुर्गी' (वय २९) असे असून तो फिल्टर पाडा, पवई येथील रहिवासी आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली.
यानंतर आरोपीच्या अंगझडतीमध्ये विविध मूल्यांच्या नोटांसह ६ लाख ३३ हजार २९० रुपये रोख रक्कम आणि चोरीस गेलेला ओप्पो मोबाईल फोन जप्त करण्यात आला. एकूण ६ लाख ३८ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वैभव काटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत सातपुते, पोलीस उपनिरीक्षक माणिक घोगरे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस कर्मचारी आनंद निकम, अजित जाधव, संतोष कांबळे, अभिजीत कदम, गणेश खेडकर, सचिन चव्हाण आणि स्वप्नील काकडे यांनी केली.
गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दहा तासांत आरोपीला अटक करून चोरीचा बहुतांश मुद्देमाल हस्तगत केल्याने खार पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी तपासकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0