मोबाईल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद; मुंबईतील ५ गुन्हे उघड, ६ स्मार्टफोन जप्त
सर जे. जे. मार्ग पोलिसांनी गस्तीदरम्यान संशयित हालचाली करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून सहा चोरीचे स्मार्टफोन जप्त करण्यात आले. तपासादरम्यान आरोपीने मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. 23 : सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने मोबाईल चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक करून विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून सहा स्मार्टफोन जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अहमद जाफर शेख उर्फ अहमद पाया असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 20 जून 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक सैफन कुरणे व त्यांचे पथक सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी एक संशयित इसम पोलिसांना पाहून घाबरल्यासारखा वागत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.
पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन दोन पंचांच्या उपस्थितीत झडती घेतली. त्यावेळी आरोपीच्या खिशातून चार मोबाईल फोन आढळून आले. मोबाईलच्या तपासणीत त्यापैकी एक मोबाईल सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर आरोपीची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपीने मोबाईल चोरीची कबुली दिली. अटकेदरम्यान केलेल्या पंचनाम्यात आणखी दोन मोबाईल जप्त करण्यात आले. अशाप्रकारे आरोपीकडून एकूण सहा स्मार्टफोन हस्तगत करण्यात आले.
पाच गुन्ह्यांची उकल
तपासादरम्यान आरोपीने मुंबईतील विविध भागांत मोबाईल चोरी केल्याचे समोर आले. त्यानुसार खालील पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे – गु.र.क्र. 451/26
नागपाडा पोलीस ठाणे – गु.र.क्र. 355/26
पायधुनी पोलीस ठाणे – गु.र.क्र. 732/26
एल. टी. मार्ग पोलीस ठाणे – गु.र.क्र. 830/26
भोईवाडा पोलीस ठाणे – गु.र.क्र. 247/26
सर्व गुन्हे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत दाखल आहेत.
तपास पथकाचे कौतुक
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सैफन कुरणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार शिंदे, जाधव, पोलीस शिपाई बोडके, भोळे, काळे, धात्रक तसेच तांत्रिक सहाय्यक पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
पोलीस आरोपीच्या इतर गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी करत असून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0