₹60.65 लाखांचे दागिने चोरीला गेल्याचा बनाव; गोल्डस्टार कंपनीच्या कर्मचाऱ्यासह दोघांना अटक, संपूर्ण मालमत्ता जप्त

मुंबईतील एमआयडीसी पोलीस ठाण्याने ₹60.65 लाख किमतीचे दागिने चोरीला गेल्याचा बनाव करणाऱ्या गोल्डस्टार ज्वेलरी कंपनीच्या कर्मचाऱ्यास अटक केली आहे. अपघाताचे नाटक रचून दागिन्यांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी 100 टक्के मालमत्ता हस्तगत केली आहे.

Jun 16, 2026 - 22:44
 0  5
₹60.65 लाखांचे दागिने चोरीला गेल्याचा बनाव; गोल्डस्टार कंपनीच्या कर्मचाऱ्यासह दोघांना अटक, संपूर्ण मालमत्ता जप्त
गोल्डस्टार ज्वेलरी, एमआयडीसी पोलीस, दागिने चोरी प्रकरण

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई, दि. १६ जून : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने ₹60 लाखांहून अधिक किमतीचे दागिने चोरीला गेल्याचा बनाव करणाऱ्या गोल्डस्टार ज्वेलरी कंपनीच्या कर्मचाऱ्यासह त्याच्या साथीदाराला अटक करून गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी अपहार करण्यात आलेली ₹60,65,656 किंमतीची संपूर्ण मालमत्ता हस्तगत केली आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 635/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 316(4) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांचन पवार यांच्या गोल्डस्टार ज्वेलरी कंपनीत कार्यरत असलेला कर्मचारी अविनाश गंगाधर कदम (वय 26) याच्याकडे कंपनीचे ₹60.65 लाख किमतीचे दागिने ग्राहकांकडे डिलिव्हरीसाठी देण्यात आले होते. मात्र, डिलिव्हरीसाठी जात असताना दुचाकीचा अपघात झाल्याने आपण बेशुद्ध पडलो आणि त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी दागिन्यांची बॅग चोरून नेल्याचा दावा त्याने केला होता.

तपासादरम्यान पोलिसांना अविनाश कदमच्या कथनात विसंगती आढळून आली. अपघातात कोणतीही गंभीर दुखापत झाली नसतानाही त्याने रुग्णालयात दाखल राहण्याचा आग्रह धरल्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर घटनास्थळ परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.

या तपासात एक संशयित व्यक्ती घटना घडण्यापूर्वी घटनास्थळाजवळ संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. त्याची ओळख मनोज हनमंत जोगदंड (वय 41) अशी पटली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.

अविनाश कदम आणि मनोज जोगदंड यांना समोरासमोर बसवून कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी दोघेही मित्र असून त्यांनी पूर्वनियोजित कट रचून दागिन्यांच्या चोरीचा बनाव केल्याची कबुली दिली. कंपनीने विश्वासाने दिलेल्या दागिन्यांचा अपहार करण्यासाठी अपघाताचे नाटक रचल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून गुन्ह्यातील ₹60,65,656 किंमतीचे दागिने आणि मालमत्ता पूर्णपणे जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान टळले आहे.

ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, पोलीस सहआयुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पर्बत, पोलीस हवालदार बडे, पोलीस शिपाई जाधव, लोखंडे, कदम, शिंदे, पवार तसेच तांत्रिक मदतीसाठी पोलीस हवालदार विशाल पिसाळ यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0