मुंबईत कोडेन फॉस्फेटयुक्त सिरपचा मोठा साठा जप्त; एनडीपीएस कायद्यान्वये चार आरोपींवर कारवाई
मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने मालाड येथे कारवाई करत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोडेन फॉस्फेटयुक्त सिरपच्या ४,७३४ बाटल्या आणि एक मोटारसायकल असा ५३.०७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. १४ जून : मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने मालाड परिसरात कारवाई करत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोडेन फॉस्फेटयुक्त सिरपचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ४,७३४ बाटल्या आणि एक मोटारसायकल असा ५३ लाख ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चार आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, १३ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मालाड (पश्चिम) येथील एस. व्ही. रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोलपंपासमोर चार जण कोडेन फॉस्फेटयुक्त सिरपच्या बाटल्या विक्रीसाठी घेऊन आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार कक्ष ११, गुन्हे प्रकटीकरण शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, कांदिवली (प.) येथील गस्ती पथकाने सापळा रचून कारवाई केली. घटनास्थळी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये तीन प्रौढ आरोपी आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
मालाडमध्ये १५३ बाटल्या जप्त
प्राथमिक कारवाईदरम्यान आरोपींकडून कोडेन फॉस्फेटयुक्त सिरपच्या १५३ बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलीस शिपाई नरेश वरठा यांच्या फिर्यादीवरून मालाड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
खारघरमधील गोदामावर छापा
तपासादरम्यान आरोपींची सखोल चौकशी करण्यात आली असता, एका आरोपीचे नवी मुंबईतील खारघर येथे गोदाम असल्याची माहिती समोर आली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशाच प्रकारचे कोडेन फॉस्फेटयुक्त सिरप साठवून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला सोबत घेऊन खारघर येथे छापा टाकला. या कारवाईत गोदामातून ४,५८१ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
५३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत
दोन्ही कारवायांमध्ये मिळून एकूण ४,७३४ कोडेन फॉस्फेटयुक्त सिरपच्या बाटल्या, ज्यांची अंदाजे किंमत ५२ लाख ७ हजार ४०० रुपये आहे, तसेच १ लाख रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. अशाप्रकारे एकूण ५३ लाख ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पुढील तपास सुरू
या प्रकरणातील अंमली पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता, त्यामागे आणखी कोणते जाळे कार्यरत आहे का, तसेच या सिरपची विक्री कोणत्या भागात केली जात होती, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपआयुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कक्ष ११ चे पोलीस निरीक्षक गणेश माळी, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, रघुनाथ पाटील, तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
मुंबईत अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून नशाविरोधी लढ्यात गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0