सायबर फसवणुकीतील मुख्य आरोपी थायलंडमधून भारतात ताब्यात; पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कारवाई
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश काळे याला थायलंडमधून भारतात आणण्यात यश मिळवले आहे. रेड कॉर्नर नोटीस, लुकआउट सर्क्युलर आणि प्रत्यार्पण प्रक्रियेच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड, दि. 11 जून : आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेल्या सायबर फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश काळे याला थायलंडमधून भारतात आणण्यात पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आरोपीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस, लुकआउट सर्क्युलर (LOC) आणि प्रत्यार्पण (Extradition) प्रक्रिया राबवून ही कारवाई करण्यात आली.
सायबर पोलिसांच्या तपासात गणेश काळे हा विविध सायबर फसवणूक प्रकरणांमध्ये सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्याविरुद्ध पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांतील अनेक गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान तो प्रथम संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
थायलंडमध्ये लपल्याची माहिती
सप्टेंबर 2025 मध्ये आरोपी UAE सोडून थायलंडमध्ये गेल्याची खात्रीशीर माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर महाराष्ट्र शासन, केंद्रीय गृह मंत्रालय आणि इंटरपोल यांच्या समन्वयातून आरोपीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस आणि लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले.
आरोपी दुसऱ्या देशात पलायन करण्याच्या तयारीत असताना थायलंडमधील सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला भारतात आणण्यात आले.
मुंबई विमानतळावर ताबा
11 जून 2026 रोजी मुंबई विमानतळावर आरोपीचा अधिकृत ताबा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांच्या पथकाने घेतला. त्यानंतर संबंधित गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
अनेक राज्यांतील गुन्ह्यांचा उलगडा
गणेश काळे याच्या अटकेमुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील अनेक सायबर गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई, तेलंगणा आणि इतर राज्यांमध्ये त्याच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सायबर पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि विशेष तपास पथकाच्या समन्वयातून ही यशस्वी मोहीम राबविण्यात आली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर गुन्हेगारांविरोधातील ही एक महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0