मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये मोठी कारवाई; 74.97 कोटींचा एमडी ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त, दोन आरोपी जेरबंद
साकीनाका पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सुरू असलेला मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत 74.97 कोटी रुपयांचा अंमली पदार्थ, रसायने आणि उत्पादन साहित्य जप्त करण्यात आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. 2 जून : साकीनाका पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यात सुरू असलेल्या मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाच्या बेकायदेशीर उत्पादन केंद्रावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 74.97 कोटी रुपयांचा अंमली पदार्थ, रसायने आणि उत्पादनासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
साकीनाका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. 21 मे 2026 रोजी अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील पेनीनसुला हॉटेलसमोर 101 ग्रॅम मेफेड्रॉन विक्रीसाठी आणलेल्या मुस्कान समीर खान (वय 26) या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
तपासादरम्यान तिने हा अंमली पदार्थ वझुल कमर अबुल वफा चौधरी उर्फ पप्पू (वय 56, रा. मुंब्रा, ठाणे) याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर 26 मे रोजी पोलिसांनी शिळफाटा परिसरातून त्याला अटक केली.
सखोल चौकशी आणि तांत्रिक तपासात आरोपीने गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील वरखड (ता. नांदोद/राजपिपला) येथे भाड्याने घेतलेल्या घरात मेफेड्रॉन तयार करत असल्याची कबुली दिली. या माहितीनुसार साकीनाका पोलिसांच्या विशेष पथकाने गुजरातमध्ये छापा टाकला.
छाप्यात 20.040 किलो द्रवरूप मेफेड्रॉन, विविध प्रकारची रसायने, स्टेरर मशीन, व्यावसायिक फ्रीज, फ्लास्क आणि अंमली पदार्थ निर्मितीसाठी लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार किंमत सुमारे 74.76 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत एकूण 20.141 किलो मेफेड्रॉन, उत्पादनासाठी लागणारी रसायने, साहित्य आणि आरोपींचे मोबाईल फोन असा मिळून एकूण 74.97 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त मनोज कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. साकीनाका पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे मोठे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त झाल्याचे मानले जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास साकीनाका पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0