उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; 36 लाखांच्या चोरीचा उलगडा, सहा आरोपी जेरबंद

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी 36 लाख रुपये किमतीच्या बीअर स्टोरेज टँक चोरी प्रकरणाचा छडा लावत सहा आरोपींना अटक केली आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि सखोल चौकशीच्या आधारे चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

Jun 2, 2026 - 01:31
Jun 2, 2026 - 01:32
 0  4
उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; 36 लाखांच्या चोरीचा उलगडा, सहा आरोपी जेरबंद
उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस, 36 लाख चोरी प्रकरण

पुणे, दि. १ जून : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी उत्कृष्ट तपास कौशल्याचे प्रदर्शन करत 36 लाख रुपये किमतीच्या औद्योगिक साहित्य चोरी प्रकरणाचा उलगडा केला आहे. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले 10 बीअर स्टोरेज टँक जप्त करण्यात आले आहेत.

सावरदरी (ता. खेड, जि. पुणे) येथील औद्योगिक परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या एका बीअर उत्पादन कंपनीमधून 20 फेब्रुवारी ते 30 मार्च 2026 या कालावधीत 36 लाख रुपये किमतीचे 10 मोठे स्टोरेज टँक चोरीस गेले होते. याप्रकरणी कंपनीचे प्रतिनिधी विवेक मारुती खैरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेनंतर तब्बल 40 दिवसांनी चोरीची माहिती समोर आल्याने तपासास अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र पोलिस उपआयुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी व तपास पथकाने सुमारे 30 ते 35 कंपन्यांच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. जवळपास 600 जीबीहून अधिक डेटा तपासून संशयित वाहनांची माहिती मिळवण्यात आली.

तपासादरम्यान कंपनीतील माजी विश्वासू कर्मचारी प्रसाद राजळे याच्यावर संशय बळावला. तांत्रिक पुरावे आणि चौकशीतून त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी चोरीमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींना अटक केली. चोरीस गेलेले सर्व 10 स्टोरेज टँक पुणे आणि ठाणे परिसरातून जप्त करण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रसाद विनोद राजळे (वय 29), चंदन अर्जुन सिंग (वय 38), अली अहमद चौधरी (वय 32), फिरोज असगर अली खान (वय 38), किसनकुमार सुभाषचंद्र गुप्ता (वय 24) आणि नियाज मोहम्मद इसराईल (वय 51) यांचा समावेश आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त सारंग आवाड, अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, पोलिस उपआयुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.