हिंगोलीत हळदीची होळी; भाव घसरल्याने शेतकऱ्यांचा संताप, सरकारविरोधात आंदोलन

हिंगोली जिल्ह्यात हळदीचे दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर हळदीची होळी करत राज्य सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या लुटीबाबतही शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केले.

Apr 22, 2026 - 19:46
 0  196
हिंगोलीत हळदीची होळी; भाव घसरल्याने शेतकऱ्यांचा संताप, सरकारविरोधात आंदोलन
हिंगोलीत हळदीची होळी; भाव घसरल्याने शेतकऱ्यांचा संताप, सरकारविरोधात आंदोलन

हिंगोली (प्रतिनिधी) –भगवानराव मस्के

हिंगोली : पिवळ्या सोन्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत काल शेतकऱ्यांनी मार्केट बंद ठेवत राज्य सरकारचा निषेध केला. त्यानंतर आज (२२ एप्रिल २०२६) शेतकऱ्यांनी वाशिम-जिंतूर महामार्ग येथे हळद रस्त्यावर आणून तिची होळी केली.

शेतकऱ्यांच्या मते, बाजारात हळदीला १६,००० रुपयांपेक्षा अधिक दर मिळतो, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती येताना तो १२,००० रुपयांखाली येतो. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

याशिवाय, खाजगी व्यापाऱ्यांकडून ‘बटाव’च्या नावाखाली प्रति शेकडा दोन रुपये कपात केली जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला. तसेच रोख रक्कम न देता RTGS द्वारे उशिरा पैसे दिले जात असल्यामुळे अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटना च्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार निषेध केला. “हळदीचे दर वाढले नाहीत तर येत्या काळात मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी हळद फेकून आंदोलन करू,” असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

आंदोलनादरम्यान प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव नारायण पाटील तसेच सेनगाव बाजार समितीचे प्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.

या आंदोलनात संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, तालुका अध्यक्ष प्रवीण मते, सतीश इडोळे, शांतीराम पाटील, मनोहर सावके पाटील यांसह अनेक पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 1
Wow Wow 0