बदलापूर प्रकरणातील अल्पवयीन मुलींचे दहावीपर्यंतचे शिक्षण शुल्क शासन भरणार

बदलापूर येथे घडलेल्या अनुचित घटनेतील दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी त्यांच्या दहावीपर्यंतच्या प्रवेश शुल्काचा संपूर्ण खर्च शासनामार्फत उचलण्यास विशेष मान्यता देण्यात आली आहे.

May 18, 2026 - 18:44
 0  3
बदलापूर प्रकरणातील अल्पवयीन मुलींचे दहावीपर्यंतचे शिक्षण शुल्क शासन भरणार
बदलापूर प्रकरण, अल्पवयीन मुली, शिक्षण शुल्क, शासन निर्णय,

मुंबई, दि. १७ :

बदलापूर येथे ऑगस्ट २०२४ मध्ये एका शाळेत घडलेल्या अनुचित घटनेतील दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी त्यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण प्रवेश शुल्क खर्च शासनामार्फत अदा करण्यास विशेष मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांनी या पीडित मुलींच्या शिक्षणाचा खर्च शासन उचलणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार संबंधित मुलींच्या पालकांच्या इच्छेनुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात दोन्ही मुलींना संबंधित शाळांमध्ये ज्युनिअर केजीमध्ये प्रवेश देण्यात आला होता.

शासन निर्णयानुसार, निर्भया क्रमांक १ हिचे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे तसेच निर्भया क्रमांक २ हिचे प्रलंबित सिनिअर केजी आणि इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे प्रवेश शुल्क शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. ही मान्यता एक वेळची विशेष बाब म्हणून देण्यात आली असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९’ अंतर्गत हा खर्च शासन उचलणार असून दोन्ही मुली ज्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत त्या शाळांना विहित करण्यात आलेल्या रकमेइतके शुल्क संबंधित शैक्षणिक वर्षात अदा करण्यात येणार आहे.

यासाठी आवश्यक कार्यवाही संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद यांच्या मार्फत करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0