मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कल्याण येथे शासकीय वसतिगृहाची सुविधा; 2026-27 पासून प्रवेश प्रक्रिया

ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कल्याण येथे शासकीय मुलांचे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. 2026-27 शैक्षणिक वर्षापासून पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून विविध प्रवर्गांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

Jun 8, 2026 - 20:32
 0  4
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कल्याण येथे शासकीय वसतिगृहाची सुविधा; 2026-27 पासून प्रवेश प्रक्रिया
कल्याणमध्ये ओबीसी व मागास प्रवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह सुरू

मुंबई | प्रतिनिधी

इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) यांतील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कल्याण येथे शासकीय मुलांचे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या सुविधेमुळे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना निवासाची सोय उपलब्ध होणार आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हानिहाय वसतिगृह सुरू करण्याच्या योजनेअंतर्गत हे वसतिगृह कार्यान्वित करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, इमारत क्रमांक ए-10, पहिला मजला, कल्याण (जिल्हा ठाणे) येथे हे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे.

सन 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून विहित मुदतीत अर्ज करणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रथम प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागा उपलब्ध असल्यास पात्र विद्यार्थ्यांना तृतीय आणि चतुर्थ वर्षासाठीही प्रवेश दिला जाणार आहे. द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बारावी परीक्षेतील अंतिम गुणांचा विचार केला जाणार आहे.

आरक्षणाची तरतूद

वसतिगृहातील जागांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे :

इतर मागास वर्ग (ओबीसी) – 51 टक्के

विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) – 33 टक्के

विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) – 6 टक्के

दिव्यांग विद्यार्थी – 4 टक्के

अनाथ विद्यार्थी – 2 टक्के

आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) – 4 टक्के

अधिक माहितीसाठी संपर्क

वसतिगृह प्रवेशासंदर्भातील अटी, शर्ती आणि इतर माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर. सी. चेबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई येथे संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मुंबई उपनगरच्या सहाय्यक संचालक मयुरी कदम यांनी केले आहे.

उच्च शिक्षणासाठी मुंबई आणि परिसरात येणाऱ्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरणार असून शिक्षणाच्या संधी अधिक सुलभ करण्यास मदत होणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0