पश्चिम आशियातील युद्धाचा वस्त्रोद्योगाला मोठा फटका; ४ हजार कोटींचे नुकसान, पॅकेजची मागणी
पश्चिम आशियातील युद्धामुळे वस्त्रोद्योगाची निर्यात ठप्प झाली असून महाराष्ट्रातील उद्योगाला ४ हजार कोटींचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रईस शेख यांनी राज्य सरकारकडे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे.
मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला बसला असून, निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्याने उद्योग गंभीर अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार Raees Shaikh यांनी राज्य सरकारकडे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे.
आमदार शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना पत्र लिहून तातडीने मदत जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.
त्यांच्या मते, मार्च २०२६ या एका महिन्यातच राज्यातील वस्त्रोद्योगाला सुमारे ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या अहवालानुसार कापूस आणि सूत यांसारख्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या असून, उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी अनेक ठिकाणी आठवड्यातील दोन ते तीन दिवस उद्योग बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्रात सुमारे ९ लाख ४८ हजार यंत्रमाग आणि ४ हजार हातमाग कार्यरत आहेत. देशातील एकूण यंत्रमागांपैकी सुमारे ३९ टक्के यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. भिवंडी, मालेगाव आणि इचलकरंजी ही वस्त्रोद्योगाची प्रमुख केंद्रे असून, या भागांतील उद्योगांवर मोठे संकट आले आहे.
शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा वस्त्रोद्योग सध्या वीजदर वाढ, कच्चा माल महागाई आणि निर्यात ठप्प होणे या तिहेरी संकटात सापडला आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास कोरोना काळाप्रमाणे मजुरांचे उलटे स्थलांतर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून उद्योग वाचवावा, अन्यथा लाखो कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता असल्याचा इशारा आमदार रईस शेख यांनी दिला आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0