‘मिशन भरारी’ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिरवा झेंडा; ठाण्यातील 59 ग्रामीण विद्यार्थ्यांची इस्रो सफर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषद शाळांतील 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची संधी मिळाली आहे. ठाणे येथून या शैक्षणिक सहलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

Apr 28, 2026 - 00:05
 0  3
‘मिशन भरारी’ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिरवा झेंडा; ठाण्यातील 59 ग्रामीण विद्यार्थ्यांची इस्रो सफर
मिशन भरारी, एकनाथ शिंदे, ठाणे विद्यार्थी इस्रो सफर

ठाणे  : उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ उपक्रमाला आज हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषद शाळांतील 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथून सकाळी 10.30 वाजता या शैक्षणिक सहलीचा शुभारंभ करण्यात आला. ‘ग्रामीण ते अवकाश’ हे व्हिजन प्रत्यक्षात उतरवणारा हा उपक्रम ठरला आहे.

‘मिशन भरारी’ उपक्रमाचे उद्घाटन 26 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धा परीक्षांद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 9316 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून 2007 विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर निवड झाली. अंतिम टप्प्यात 478 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर परीक्षा घेण्यात आली.

या संपूर्ण प्रक्रियेतून प्रत्येक तालुक्यातील सरासरी 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून एकूण 59 विद्यार्थी या विशेष सहलीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये 54 मराठी माध्यम आणि 5 उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही सहल केवळ पर्यटन नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेला उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे तसेच विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

या सहलीत विद्यार्थ्यांना संशोधन, अवकाश विज्ञान, प्रयोगशाळा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.

सहल कार्यक्रमानुसार 28 एप्रिल रोजी विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर पुतळा आणि सनसेट व्ह्यू पॉईंटला भेट दिली जाईल. 29 एप्रिल रोजी विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशन आणि प्रियदर्शिनी तारांगण येथे भेट दिली जाईल. 30 एप्रिल रोजी नैसर्गिक इतिहास संग्रहालय तर 1 मे रोजी नेपियर संग्रहालयाला भेट देऊन परतीचा प्रवास होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. राहण्याची व्यवस्था फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली असून प्रवासासाठी वातानुकूलित बसेसची सुविधा देण्यात आली आहे. सहलीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.

विद्यार्थ्यांना ब्लेझर, टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट, कॅप, स्पोर्ट्स शूज, सॉक्स, ओळखपत्र आणि ट्रॉली बॅग आदी साहित्य देण्यात येणार असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.

या उपक्रमासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा कमी पडू नये, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सहल पूर्ण करून परतल्यानंतर हे विद्यार्थी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण जिल्हा परिषद शाळांमधील इतर विद्यार्थ्यांशी करणार आहेत. त्यामुळे विज्ञानाविषयी कुतूहल आणि प्रेरणा निर्माण होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे.

या कार्यक्रमास आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार राजेश मोरे, आमदार शांताराम मोरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, उपजिल्हाधिकारी संदीप माने तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0