यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची रणनीती यशस्वी; दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. रिंगणातील चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने महायुतीला मोठे राजकीय यश मिळाले असून विदर्भातील राजकीय समीकरणांवर याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची रणनीती यशस्वी; दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी
रवि वाघमारे | जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भाच्या राजकारणात मोठी आणि धक्कादायक घडामोड घडली आहे. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. रिंगणात असलेल्या एकूण पाच उमेदवारांपैकी चार उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला. सर्वप्रथम साहेबराव कांबळे यांनी माघार घेतली. त्यानंतर साजिद बेग (आर्णी), सय्यद फारुख सय्यद करीम (दारव्हा) आणि नितीन भुतडा यांनीही अधिकृतपणे निवडणुकीतून माघार घेतली.
चारही प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता निवडणूक केवळ औपचारिकता ठरली असून कोणतेही मतदान न होता दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय निश्चित झाला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या बिनविरोध विजयामागे महायुतीचे सूक्ष्म नियोजन आणि प्रभावी रणनीती महत्त्वाची ठरली. पालकमंत्री संजय राठोड आणि भाजपचे माजी आमदार मदन येरावार यांनी या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यवतमाळच्या राजकीय इतिहासात प्रथमच विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होत असल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या घडामोडीनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. महायुतीचे कार्यकर्ते विजयाचा जल्लोष साजरा करत असताना विरोधी पक्षांकडून पडद्यामागील घडामोडींवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
१८ जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच मिळालेल्या या विजयामुळे महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा आत्मविश्वास वाढला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागल्याचे चित्र दिसत आहे.
दुष्यंत चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडीमुळे विदर्भातील महायुतीची राजकीय पकड अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे. प्रशासनाकडून लवकरच त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करून निवड प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. आता विदर्भातील इतर राजकीय घडामोडी आणि आगामी निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0