उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात एचपीव्ही लसीकरणाचा शुभारंभ; ओवी कोकलवार पहिली लाभार्थी

उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र शासनाच्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. ओवी संतोष कोकलवार हिने लस घेऊन पहिली लाभार्थी होण्याचा मान मिळवला.

Apr 27, 2026 - 22:57
 0  19
उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात एचपीव्ही लसीकरणाचा शुभारंभ; ओवी कोकलवार पहिली लाभार्थी
उमरखेड बातमी, एचपीव्ही लसीकरण

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रवी वाघमारे:

महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्साहात पार पडला. या मोहिमेअंतर्गत ओवी संतोष कोकलवार हिने लसीकरण करून घेत पहिली लाभार्थी होण्याचा मान मिळवला.

विशेष म्हणजे ओवीची आई या याच रुग्णालयातील लसीकरण विभागात इन्चार्ज म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतःच्या मुलीला प्रथम लस देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. यामुळे या मोहिमेला प्रेरणादायी सुरुवात मिळाली.

यावेळी भावना व्यक्त करताना ओवीच्या आई म्हणाल्या की, आरोग्य कर्मचारी म्हणून मी या आजाराची भीषणता जवळून पाहिली आहे. आपण इतरांना जनजागृतीचे आवाहन करत असताना सुरुवात स्वतःच्या घरापासून व्हायला हवी, असे मला वाटले. एक आई म्हणून मला माझ्या मुलीचे भविष्य सुरक्षित आणि निरोगी करायचे होते, म्हणूनच ओवीला ही लस दिली.

त्या पुढे म्हणाल्या की, एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून सर्व पालकांनी कोणतीही भीती न बाळगता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे.

ओवीने दाखवलेल्या जागरूकतेचे रुग्णालय प्रशासनाने कौतुक केले. एचपीव्ही लस ही ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना भविष्यात होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी महत्त्वाची लस आहे.

आरोग्य विभागाच्या मते, ओवीसारख्या मुलींच्या पुढाकारामुळे समाजात सकारात्मक संदेश जात असून पालकांनी लसीकरणाचे महत्त्व ओळखून वेळेवर मुलींना लस देणे गरजेचे आहे.

या कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजातील प्रत्येक मुलीला हे सुरक्षा कवच मिळावे, हीच या मोहिमेची मुख्य अपेक्षा असल्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0