शेतकरी चळवळ, यवतमाळ यांच्या आंदोलन व निवेदनावर आधारित वृत्तांकन.
यवतमाळ जिल्ह्यात पीक विमा व नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोयाबीन नुकसान भरपाईच्या यादीतून जिल्ह्याला वगळल्याच्या निषेधार्थ शेतकरी चळवळीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम पोस्ट आंदोलन करण्यात आले.
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी| रवी वाघमारे:
जिल्ह्यातील पीक विमा व नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईच्या प्रश्नावरून शेतकरी संतप्त झाले असून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘मुक्काम पोस्ट’ आंदोलन छेडण्यात आले. सोयाबीन नुकसान भरपाईच्या यादीतून यवतमाळ जिल्ह्याला वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ ‘शेतकरी चळवळ, यवतमाळ’च्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
“नांदेडला विमा मिळतो, मग यवतमाळवर अन्याय का?” असा थेट सवाल करत आंदोलकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनाचे नेतृत्व प्रा. पंढरी पाठे यांनी केले. त्यांनी जिल्ह्यातील शेती संकटाचे गंभीर चित्र प्रशासनासमोर मांडले.
प्रा. पाठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते २६ एप्रिल २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. केवळ एप्रिल महिन्यातच १८ शेतकऱ्यांनी जीवन संपवले असून मारेगाव तालुक्यात गेल्या ७२ तासांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मक्त्याने शेती करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची अधिकृत नोंद होत नसल्याचा गंभीर मुद्दाही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी मनोज ढगे यांनी पीक विमा वितरणात काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले. मात्र, या उत्तराने आंदोलकांचे समाधान झाले नाही.
कॉम्रेड सचिन मनवर यांनी पीक कापणी प्रयोगातील विलंब, डेटा अपलोडमधील त्रुटी आणि विमा कंपन्यांच्या मनमानीमुळे शेतकरी हक्काच्या पैशांपासून वंचित राहत असल्याचा आरोप केला.
यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे ११ ते १२ लाख हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहेत. पीक विमा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पीक विमा जिल्हा समन्वयक गजेंद्र राठोड यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत विमा रक्कम वितरणाबाबत लवकरच लेखी माहिती देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले.
मात्र, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रवीण आडे आणि कार्यकर्त्यांनी दिला. या आंदोलनात हरिहर तायडे, संकेत टोणे, गौरीनंदन कन्नाके यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
