महागावात जनशक्तीचा एल्गार : हाहाकार मोर्च्यापुढे झुकले प्रशासन, १२ कोटी ५६ लाखांचा निधी वितरित

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या हाहाकार मोर्च्यामुळे प्रशासनाला झुकावे लागले. लाडकी बहीण योजना आणि घरकुल योजनेतील रखडलेले हप्ते वितरित करण्यासाठी प्रशासनाने १२ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधी वितरणाची घोषणा केली.

May 28, 2026 - 21:01
 0  23
महागावात जनशक्तीचा एल्गार : हाहाकार मोर्च्यापुढे झुकले प्रशासन, १२ कोटी ५६ लाखांचा निधी वितरित
महागाव बातमी, यवतमाळ न्यूज, जन आंदोलन आधार संघर्ष समिती,

रवि वाघमारे | जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या धडक हाहाकार मोर्च्याला अभूतपूर्व यश मिळाले असून या आंदोलनापुढे अखेर प्रशासनाला झुकावे लागले आहे. सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली.

जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. शेतकरी, कष्टकरी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला. आंदोलनकर्त्यांच्या तीव्र भूमिकेमुळे प्रशासनाने अखेर लाडकी बहीण योजना आणि घरकुल योजनेतील रखडलेले हप्ते वितरित करण्यासाठी तब्बल १२ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर करून वितरण सुरू करण्याची घोषणा केली.

महागाव तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांचे प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होते. घरकुल योजनेतील हप्ते, पीक विमा आणि लाडकी बहीण योजनेतील मानधन रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. याच पार्श्वभूमीवर जगदीश नरवाडे यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत मोर्चाचे आयोजन केले.

मोर्चादरम्यान नरवाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभारावर जोरदार टीका केली. आंदोलनाचा वाढता दबाव आणि नागरिकांचा संताप पाहता प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला. गट विकास अधिकारी दत्तात्रय कदम आणि तहसीलदार गजानन पराते यांनी अधिकृतरीत्या निधी वितरण प्रक्रिया सुरू होत असल्याची घोषणा केली.

या आंदोलनानंतर संपूर्ण महागाव परिसरात जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या कार्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी संघटना म्हणून समितीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

या यशस्वी आंदोलनात गोविंदराव देशमुख, अतुलजी शिंदे, पंजाबराव पवार, ओम कुसुंगवार, साम कदम, दत्ता पाटे, अमोल वानखेडे यांच्यासह अनेक शेतकरी, महिला व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. आंदोलन यशस्वी झाल्यानंतर जगदीश नरवाडे यांनी सर्वांचे आभार मानत जनतेच्या हक्कांसाठीचा लढा पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी बोलताना जगदीश नरवाडे म्हणाले की, “प्रशासनाने केवळ आकड्यांचा खेळ दाखवून आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न करू नये. उर्वरित मागण्या तात्काळ मंजूर न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडून मंत्रालयाला घेराव घालण्यात येईल.”

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0