सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करा; पोलिस महासंचालक सदानंद दाते यांचे आवाहन
महाराष्ट्र पोलिस अकादमीत ५८३ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांचा दीक्षांत संचलन सोहळा पार पडला. यावेळी पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी नव्या अधिकाऱ्यांना सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पणाची भावना जोपासत समाजाचे संवेदनशील सेवक बनण्याचे आवाहन केले.
नाशिक ब्यूरो
नाशिक, दि. ९ जून २०२६ : पोलिस सेवेत दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण ही त्रिसूत्री अंगीकारत कायद्याचे रक्षक आणि समाजाचे संवेदनशील सेवक म्हणून कार्य करावे, असे आवाहन राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी केले.
महाराष्ट्र पोलिस अकादमीत आज सकाळी प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सत्र क्रमांक १२७ चा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात ४२० पुरुष (गोवा राज्यातील एका प्रशिक्षणार्थीसह) आणि १६३ महिला अशा एकूण ५८३ प्रशिक्षणार्थ्यांनी १२ महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र पोलिस दलात प्रवेश केला.
यावेळी अकादमीचे संचालक नवल बजाज उपस्थित होते. त्यांनी नव्याने पोलिस दलात दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. सोहळ्यास पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनपुरे आणि पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना पोलिस महासंचालक सदानंद दाते म्हणाले की, गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात पोलिस दलाने उल्लेखनीय यश मिळविले आहे. आता त्या भागातील नागरिकांच्या मनात सुरक्षेबरोबरच सेवेची भावना निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम पुढे करावे लागणार आहे. बदलत्या काळात गुन्हेगारीचे स्वरूप झपाट्याने बदलत असून सायबर गुन्हे आणि आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे.
अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्याचे आवाहन करत त्यांनी तरुण अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घ्यावी, असे सांगितले. तसेच कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान, समस्या सोडविण्याची क्षमता आणि सांघिक कार्यपद्धती ही पोलिस दलाच्या यशाची महत्त्वाची सूत्रे असल्याचे त्यांनी नमूद केले.
"पोलिस दलाची खरी ताकद ही जनतेचा पोलिसांवरील विश्वास आहे. नागरिक पोलिस ठाण्यात केवळ कायदेशीर मदतीसाठी नव्हे, तर न्याय आणि सुरक्षिततेच्या अपेक्षेने येतात. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने कायद्याचा रक्षक आणि समाजाचा संवेदनशील सेवक म्हणून कार्य करणे गरजेचे आहे," असेही त्यांनी सांगितले.
यावेळी "प्रत्येक पोलिस हा गणवेशातील नागरिक असून नागरिक हा गणवेश नसलेला पोलिस आहे" ही भावना समाजात रुजविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पारितोषिक विजेते प्रशिक्षणार्थी :
रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर, कै. यशवंतराव चव्हाण सुवर्ण करंडक (सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी) आणि अहिल्याबाई होळकर करंडक (सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी) – उत्कर्षा शशिकांत जाधव
द्वितीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी – मोहन चमाबाई मच्छिंद्र पालमपल्ली
कायदा विषयात सर्वोत्कृष्ट (डॉ. बी. आर. आंबेडकर करंडक) – अमृता माया सुभाष जाधव
सर्वोत्कृष्ट नेमबाज (एन. एम. कामटे सुवर्ण करंडक) – राजू जया दत्तात्रय जाधव
सर्वोत्कृष्ट कवायत – बळिराम धोंडूबाई मानेजी बुडसे
सर्वोत्कृष्ट अभ्यास (सिल्व्हर बॅटन) – वैशाली सविता अर्जुन शेळके
दीक्षांत सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सहसंचालक नंदकुमार ठाकूर, उपसंचालक (बाह्य वर्ग) प्रशांत खैरे, उपसंचालक (प्रशिक्षण) गीता चव्हाण, उपसंचालक (सेवांतर्गत प्रशिक्षण) महेश चिमटे तसेच उपसंचालक (आयटी व सुरक्षा) पद्मजा चव्हाण-बढे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0