रायगडचे पोलीस अधीक्षक अॅक्शन मोडवर; एलसीबीचे सहा पोलीस कर्मचारी निलंबित, चोरीच्या मुद्देमालाच्या नोंदीत गंभीर विसंगती
रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) एका उपनिरीक्षकासह सहा पोलिसांना संशयास्पद कामगिरी आणि चोरीच्या मुद्देमालाच्या नोंदीत गंभीर विसंगती आढळल्याने निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी ही कठोर कारवाई केली असून, विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
रायगड प्रतिनिधी: दीपक शिंदे
रायगड जिल्ह्यात पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडवणारी कारवाई करण्यात आली आहे. माणगाव येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) एका उपनिरीक्षकासह सहा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी ही कठोर कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बंद कंपनीतून तांबे व स्टीलच्या साहित्याची चोरी झाली होती. या प्रकरणात एलसीबीच्या पथकाने चोरीचा मुद्देमाल जप्त केला होता. मात्र, जप्त केलेल्या मुद्देमालाची अधिकृत नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्याऐवजी कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले.
चोरीचा मुद्देमाल आणि त्याच्या नोंदीमध्ये आढळलेल्या गंभीर विसंगतीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी संबंधित सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.
निलंबित अधिकारी आणि कर्मचारी:
उपनिरीक्षक अविनाश पाटील
बाबासो पिंगळे
वाघमोडे
सोंडकर
पहलकर
आंबले
निलंबन कालावधीत या सर्व कर्मचाऱ्यांना अलिबाग येथील पोलीस नियंत्रण कक्षात दररोज दोन वेळा हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच त्यांना शासकीय किट, ओळखपत्र आणि इतर अधिकृत साहित्य जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना कोणतीही खासगी नोकरी, व्यवसाय किंवा अन्य आर्थिक उपक्रम करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रायगड पोलीस दलातील ही कारवाई शिस्तभंग आणि पारदर्शकतेबाबत प्रशासनाचा कठोर संदेश मानली जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0