नागपुरात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधांवर भर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपुरात क्रीडा क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुविधा उभारल्या जात असून यामुळे क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात सांगितले. आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरावर आयोजित करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
नागपूर | प्रतिनिधी
नागपुरात क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक स्तरावर आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असून त्यामुळे राज्यातील क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते.
कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार संजय भेंडे, अरुण लखानी, महापौर नीता ठाकरे, आयोजन समितीचे अध्यक्ष संदीप जोशी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धांमुळे अनेक खेळाडूंना संधी, प्रशिक्षण आणि व्यासपीठ उपलब्ध होत असून नागपुरात क्रीडा संस्कृती विकसित होत आहे. बदलत्या काळात शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविण्यावर भर वाढला असून या क्षेत्रात व्यावसायिक संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, मानकापूर येथे देशातील अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. भविष्यात येथे जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे शक्य होणार आहे. तसेच क्रीडा विद्यापीठाची उभारणीही सुरू असून या सर्व सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात सक्षम मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होईल.
आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरावर
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरावर आयोजित करण्याची घोषणा केली. या स्पर्धेत एक लाखांहून अधिक खेळाडूंना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
नागपूरला देशाची क्रीडा राजधानी बनविण्याचे ध्येय समोर ठेवून शहरात विविध क्रीडा सुविधा विकसित केल्या जात आहेत. शहरात किमान २५ जलतरण तलाव उभारण्याचे नियोजन असून सर्व भागांमध्ये क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. नागपुरातील किमान एक लाख मुले-मुली दररोज सायंकाळी क्रीडांगणांवर दिसावीत, असे स्वप्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
2036 ऑलिम्पिकच्या दृष्टीने क्रीडा विकासाला वेग
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले की, 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन व्हावे यासाठी देशभरात प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार क्रीडा क्षेत्रातील संसाधने, प्रशिक्षण आणि सुविधा वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे.
त्या म्हणाल्या की, खासदार क्रीडा महोत्सव हा केवळ आठ दिवसांचा कार्यक्रम नसून खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. महाराष्ट्र विविध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सातत्याने अव्वल तीन राज्यांमध्ये स्थान मिळवत असून ही अभिमानास्पद बाब आहे.
जिल्ह्यातील क्रीडा विकासासाठी 45 कोटींची तरतूद
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील क्रीडा सुविधांच्या विकासासाठी सुमारे 45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच खासदार क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आयोजक समितीचे अभिनंदन केले.
14 खेळाडूंना ‘खासदार क्रीडा भूषण पुरस्कार’
कार्यक्रमात विविध क्रीडा प्रकारांतील 14 उत्कृष्ट खेळाडूंना ‘खासदार क्रीडा भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. व्हॉलीबॉलमधील कर्मण्य चिलकुलवार, अॅथलेटिक्समधील अंजली मडावी, खो-खोमधील सिद्धेश सातपुते, सॉफ्टबॉलमधील उर्वशी सनेश्वर, हँडबॉलमधील हरप्रीतसिंग रंधावा, कबड्डीतील मंगला ढबाले, स्केटिंगमधील अदिती धांडे, बुद्धिबळातील श्रद्धा बजाज, कुस्तीतील नंदिनी साहू, बॅडमिंटनमधील निशिका गोखे, योगासनातील भरत डेलिकर, बास्केटबॉलमधील गुंजन मंत्री, जिम्नॅस्टिकमधील अवनी राठोड आणि जलतरणमधील अदित्री पयासी यांचा गौरव करण्यात आला.
याशिवाय उत्कृष्ट संघटक पुरस्कार विजय डांगरे, उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार रवींद्र टोंग, क्रीडा सेवक पुरस्कार उमेश नायडू तसेच उत्कृष्ट क्रीडा मंडळ म्हणून यंग मुस्लिम फुटबॉल क्लब यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

