जनगणना 2027: घर-यादी गणनेत गडचिरोली राज्यात आघाडीवर; 99.46 टक्के नोंदी पूर्ण
जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या घर-यादी गणनेत गडचिरोली जिल्ह्याने 99.46 टक्के नोंदी पूर्ण करत राज्यात आघाडी घेतली आहे. नागरिकांनी जनगणना प्रक्रियेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांनी केले आहे.
गडचिरोली | प्रतिनिधी
भारताच्या जनगणना 2027 मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या घर-यादी गणनेत गडचिरोली जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात आघाडीचे स्थान मिळवले आहे. 10 जून 2026 रोजीच्या आढावा अहवालानुसार जिल्ह्यातील 99.46 टक्के घर-यादी नोंदी पूर्ण झाल्या असून केवळ 0.54 टक्के काम शिल्लक आहे.
अहवालानुसार राज्यात सरासरी 13.17 टक्के घर-यादी नोंदी प्रलंबित आहेत. मात्र नक्षलग्रस्त, वनबहुल आणि भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प प्रलंबित नोंदी असल्याने प्रशासनाच्या प्रभावी नियोजनाचे आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाचे हे उदाहरण मानले जात आहे.
जनगणना 2027 अंतर्गत घर-यादी गणनेचे काम 14 जून 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. जनगणना ही भारत सरकारच्या जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत राबविण्यात येणारी राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची प्रक्रिया असून प्रत्येक नागरिकाने आवश्यक माहिती अचूकपणे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, "जनगणना ही राष्ट्राच्या विकासाचा पाया आहे. प्रत्येक नागरिकाने जनगणना कर्मचाऱ्यांना सहकार्य करून अचूक माहिती द्यावी. ही माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते आणि तिचा वापर केवळ विकास नियोजनासाठी केला जातो."
शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, गृहनिर्माण आणि विविध कल्याणकारी योजनांचे नियोजन जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित असते. त्यामुळे उर्वरित नोंदी पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

