महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिकासाठी ऑनलाइन अर्ज सुरू
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगाम 2026-27 साठी महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिक योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले असून पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोली | प्रतिनिधी (दि. ७ मे २०२६)
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान तसेच राष्ट्रीय खाद्य तेल अभियान-अंतर्गत सन २०२६-२७ साठी प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अन्नधान्य, तृणधान्य, गळीतधान्य, भरडधान्य आणि कडधान्य पिकांसाठी सुधारित व दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे.
खरीप हंगाम २०२६-२७ साठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी स्वतः महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा किंवा जवळच्या सेतू केंद्र, सीएससी केंद्र, सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज सादर करावा. अर्ज करताना फार्मर आयडी, आधार क्रमांक, सातबारा उतारा, बँक खाते तपशील आणि आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत.
जिल्ह्यातील कृषी अधिकारी, कर्मचारी आणि विस्तार यंत्रणेमार्फत या योजनांचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यात येत असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0