‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ला गडचिरोलीवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा संकल्प

जलसंधारण सप्ताहाच्या समारोपानिमित्त गडचिरोलीत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन. नागरिक, युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग; पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा संकल्प.

Aug 21, 2026 - 21:30
 0  7
‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ला गडचिरोलीवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा संकल्प
गडचिरोली महा वॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर, जलसंधारण सप्ताह, जलसंधारण, पाणी बचत, पाणी अडवा पाणी जिरवा, मिलिंद नरोटे, गडचिरोली

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

गडचिरोली, दि. २१ (जिमाका) : जलसंधारण सप्ताहाच्या समारोपानिमित्त गडचिरोली शहरात आयोजित करण्यात आलेल्या **‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’**ला नागरिक, युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया’ असा संदेश देत जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यात आली. इंदिरा गांधी चौकातून सुरू झालेल्या या वॉकेथॉनला आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. त्यानंतर पोर्टेगाव येथील जिल्हा स्टेडियममध्ये वॉकेथॉनचा समारोप करण्यात आला.

१५ ते २१ ऑगस्ट या कालावधीत आयोजित जलसंधारण सप्ताहाच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण विभागातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा प्रणिती निनोरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश कोठेकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद घाडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन आवश्यक

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी पाणी संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेता पाण्याचे योग्य नियोजन करणे ही काळाची गरज आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंग, तुषार सिंचन यांसारख्या जलसंधारणाच्या उपाययोजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्याचा सुजलाम्-सुफलाम् विकास साधण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या पातळीवर छोट्या-छोट्या कृती करून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही आमदार डॉ. नरोटे यांनी केले.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ची लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन

नगराध्यक्षा प्रणिती निनोरेकर यांनीही भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच पाण्याचे संवर्धन आणि योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त केली.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना केवळ घोषवाक्य न राहता ती लोकचळवळ बनली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने जलसंधारणाच्या कामात आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

जलसंधारण विषयावरील रिल्ससाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

जलसंधारण विषयावर रिल्स तयार करून पाठविण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्यावरही या उपक्रमातून भर देण्यात येत आहे. युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पाणी बचतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले.

युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग; लकी ड्रॉमधून विजेत्यांची निवड

महा वॉकेथॉनमध्ये युवक-युवतींसह नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. जलसंधारण सप्ताहाच्या समारोपप्रसंगी आयोजित या उपक्रमात सहभागी झालेल्या युवक-युवतींमधून लकी ड्रॉद्वारे निवड झालेल्या सहभागीदारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

जलसंधारण सप्ताहाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात पाणी बचत, पाण्याचे योग्य नियोजन आणि जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. पावसाचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरविणे आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळणे, हा संदेश या महावॉकेथॉनमधून देण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.