गडचिरोलीत २३ ते २८ सप्टेंबरदरम्यान पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रमांचे आयोजन
गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी २३ ते २८ सप्टेंबर २०२६ दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. ट्रेकिंग, नेचर वॉक, रील्स व छायाचित्रण स्पर्धा, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम होणार आहेत.
प्रतिनिधी : नरेश शिंदे
जिल्ह्यातील चार पर्यटन सर्किट्सच्या माध्यमातून पर्यटनाला चालना; युवक आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
गडचिरोली, दि. १५ : जिल्ह्यातील निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळांना व्यापक प्रसिद्धी देऊन पर्यटनाला चालना देण्यासोबतच स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी दि. २३ ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
महोत्सवाच्या प्रभावी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून नियोजनबद्ध तयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक
पर्यटन महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह वन, महसूल, पर्यटन आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
चार पर्यटन सर्किट्सच्या माध्यमातून पर्यटनाला चालना
गडचिरोलीतील पर्यटन केवळ एखाद्या विशिष्ट स्थळापुरते मर्यादित न ठेवता जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भागातील पर्यटनस्थळांना एकमेकांशी जोडून चार पर्यटन सर्किट्सच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे.
उत्तर सर्किटमध्ये टिपागड, मेंढालेखा, झाडापापडा आणि आरतोन्डी या पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला आहे.
दक्षिण सर्किटमध्ये फॉसिल पार्क, कमलापूर हत्ती कॅम्प आणि सोमणूर परिसराचा समावेश आहे.
तर पूर्व व पश्चिम भागात भामरागड, जिवेनी संगम, हेमलकसा, मार्कंडा, चिचडोह बॅरेज, चपराळा अभयारण्य तसेच वनविभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या धनुरा आणि सेमाना परिसराचा प्रमुखत्वाने समावेश करण्यात आला आहे.
युवक आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
या पर्यटन महोत्सवात नागरिकांसोबतच युवक आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय सेवा योजना (NSS), नेहरू युवा केंद्र तसेच स्थानिक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना विविध पर्यटनविषयक उपक्रमांशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती युवक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे.
ट्रेकिंग, नेचर वॉक आणि रील्स स्पर्धांचे आयोजन
पर्यटनस्थळांची ओळख अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महोत्सवादरम्यान ट्रेकिंग, नेचर वॉक, रील्स स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा आणि पर्यटनविषयक जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
गडचिरोलीची निसर्गसंपदा आणि इको-टुरिझमच्या संधी लक्षात घेऊन सेमाना, मार्कंडा आणि सिरोंचा परिसरात नाईट कॅम्पिंग, बोटिंग तसेच सायन्स पार्क भेटीसारख्या उपक्रमांचाही समावेश करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पर्यटनस्थळांवर आवश्यक सुविधांची पूर्वतयारी
पर्यटन महोत्सव केवळ काही दिवसांचा कार्यक्रम न राहता जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची ओळख निर्माण करणारा आणि भविष्यात पर्यटनवाढीसाठी उपयुक्त ठरणारा उपक्रम व्हावा, यासाठी प्रत्येक पर्यटनस्थळाचे वैशिष्ट्य प्रभावीपणे पर्यटकांसमोर आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पर्यटनस्थळी आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, दिशादर्शक फलक तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी आवश्यक बाबींची संबंधित विभागांनी पूर्वतयारी करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
स्थानिक ग्रामपंचायती आणि स्वयंसेवी संस्थांचा समन्वय
वनविभाग आणि पर्यटन विभागाने स्थानिक ग्रामपंचायती, महाविद्यालये, युवक, स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून महोत्सवाचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक पर्यटनस्थळासाठी जबाबदारी निश्चित करून सर्व उपक्रमांचे नियोजनबद्ध आणि प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
गडचिरोलीच्या निसर्गसंपदा, वनवैभव आणि विविध पर्यटनस्थळांना राज्याच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी हा पर्यटन महोत्सव महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.