गोरेगावमध्ये शेतकऱ्यांकडून कर्जमाफी शासन निर्णयाची होळी; सरसकट कर्जमाफीची जोरदार मागणी
गोरेगाव येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी शासन निर्णयाची होळी करत निषेध नोंदविला. सरकारने निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
हिंगोली | प्रतिनिधी - भगवानराव मस्के
गोरेगाव येथे आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकारच्या कर्जमाफी संदर्भातील शासन निर्णयाची प्रत जाळून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. संघटनेचे नेते गजानन कावरखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांनी आरोप केला की, राज्य सरकारने जाहीर केलेली "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना" ही प्रत्यक्षात अनेक अटी व शर्तींनी भरलेली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे ही योजना कर्जमाफी नसून "कर्ज वसुली योजना" असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते गजानन कावरखे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्ष शासन निर्णयामध्ये विविध निकष आणि अटी घालून लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभापासून दूर ठेवले जात आहे. सरकारने दिलेले आश्वासन पाळून सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शेतकरी हिताच्या नावाखाली होणारी फसवणूक सहन केली जाणार नाही आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, उद्धव कावरखे, अनिल कावरखे, मारुती लाखोळे, अमोल एकशिंगे, विठ्ठल सावके, नामदेव काळे, अशोक कावरखे, प्रकाश भुरभुरे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि कर्जमाफीच्या योजनेत आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1