श्री गजानन महाराज पालखीचे हिंगोली जिल्ह्यात भक्तिमय स्वागत; हरिनामाच्या गजरात वारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत
श्री क्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे हिंगोली जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. कराळे डिग्रस येथे पालखीचा मुक्काम असून वारकऱ्यांसाठी महाप्रसाद, पिण्याचे पाणी आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
हिंगोली | प्रतिनिधी : भगवानराव मस्के
"संपदा सोहळा नावडे मनाला, छंद हा लागला पंढरीचा..." या अभंगाच्या ओळींप्रमाणे आषाढी वारीचा भक्तिमय उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात अनुभवायला मिळत आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराजांची पालखी सध्या पंढरपूरकडे मार्गस्थ असून हिंगोली जिल्ह्यात तिचे भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
यंदा श्री गजानन महाराजांची पालखी ६ जून २०२६ रोजी शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाली. या पालखीसोबत ६५५ वारकरी भक्त, एक अश्व, नऊ वाहने, रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली असून ही पालखी २३ जुलै २०२६ रोजी पंढरपूर येथे दाखल होणार आहे.
२ जुलै रोजी पालखीचे हिंगोली जिल्ह्यात आगमन झाले. सेनगाव मार्गे कराळे डिग्रस येथे पालखीचा मुक्काम झाला. मार्गभर ठिकठिकाणी भक्तांनी रांगोळ्या काढून, भगवे ध्वज व पताका लावून, पुष्पवृष्टी करत तसेच हरिनामाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पालखीचे उत्साहात स्वागत केले.
वारकऱ्यांसाठी महाप्रसाद, फळे, दूध, खीर आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. कराळे डिग्रस येथे सुमारे २० क्विंटल महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
३ जुलै रोजी पालखी डिग्रस येथून डिग्रस फाटा, हिवरा जाटू, बोर्जा फाटा, येहळेगाव सोळंके, सुरेगाव, औंढा नागनाथ, वगरवाडी आणि नागेशवाडी मार्गे जवळा बाजार येथे मुक्कामी जाणार आहे. त्यानंतर ४ जुलै रोजी पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
श्री गजानन महाराजांची पालखी दरवर्षी नऊ जिल्ह्यांमधून सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास ३३ दिवसांत पूर्ण करते. शिस्त, शांतता, नम्रता, भक्ती, आनंद आणि समाधान यांचे प्रतीक म्हणून या पालखी सोहळ्याकडे पाहिले जाते.
पंढरपूर येथे पालखीचा नवमी ते चतुर्दशीपर्यंत मुक्काम असतो. या कालावधीत शेगाव संस्थानतर्फे तीन लाखांहून अधिक भाविकांना मिष्टान्न महाप्रसाद दिला जातो. तसेच एकनाथी भागवत, तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी यांसारख्या भक्ती साहित्याचेही वाटप केले जाते. संस्थानने आतापर्यंत २१ हजार १८ गावांमध्ये विविध राज्यांत भक्ती साहित्याचे वितरण केल्याची माहिती देण्यात आली आहे.
पौर्णिमेच्या दिवशी श्री गजानन महाराजांची पालखी परतीच्या प्रवासाला प्रारंभ करते. आषाढी वारीच्या या पवित्र सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून वारकऱ्यांच्या मुखातून "डोळा पहावी पंढरी, मुखी वाचावी ज्ञानेश्वरी" असा अखंड हरिनामाचा गजर सुरू आहे.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1