बाजार भोगाव येथे NDRF कडून समुदाय जनजागृती व बोट प्रशिक्षण; आपत्ती व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांना प्रत्यक्ष प्रशिक्षण

संभाव्य पूर आणि नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) टीम-5E तर्फे समुदाय जनजागृती व बोट प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्रामस्थांना आपत्ती व्यवस्थापन, बचावकार्य आणि बोट हाताळणीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

Jul 5, 2026 - 01:53
 0  3
बाजार भोगाव येथे NDRF कडून समुदाय जनजागृती व बोट प्रशिक्षण; आपत्ती व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांना प्रत्यक्ष प्रशिक्षण
NDRF, बाजार भोगाव, पन्हाळा, कोल्हापूर, आपत्ती व्यवस्थापन,

कोल्हापूर | प्रतिनिधी उमेश जाधव 

संभाव्य पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज करण्याच्या उद्देशाने पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव मंडळामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) टीम-5E तर्फे समुदाय जनजागृती व बोट प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

तहसीलदार माधवी शिंदे (पन्हाळा) तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात ग्रामस्थांना पूर, अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या वेळी घ्यावयाची आवश्यक खबरदारी, स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित व प्रभावी प्रतिसाद कसा द्यावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमात गावातील इच्छुक युवकांना बोट हाताळणीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. तसेच लाईफ जॅकेटचा योग्य वापर, पाण्यातील बचावकार्याची प्राथमिक तंत्रे, पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या पद्धती आणि आपत्तीच्या काळात स्थानिक पातळीवर समन्वय साधून प्रभावी बचावकार्य कसे करावे, याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

आपत्तीच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्थानिक स्वयंसेवक सक्षमपणे बचावकार्य करू शकतील आणि प्रशासनाला प्रभावी सहकार्य मिळावे, हा या प्रशिक्षण कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्यक्रमास NDRF टीम-5E चे कमांडर इन्स्पेक्टर महेश शिंदे, इन्स्पेक्टर अजय यादव यांच्यासह संपूर्ण NDRF पथक उपस्थित होते. तसेच मंडळ अधिकारी नलिनी मोहिते, मंडळातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या प्रशिक्षणामुळे ग्रामस्थांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली असून, पूर किंवा इतर नैसर्गिक संकटांच्या काळात स्थानिक पातळीवर तातडीने आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांची फळी तयार होण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0