येरवडा खुले कारागृहात गाई भेट आणि ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ वाटप; सुधारणा व पुनर्वसनाला नवी दिशा

येरवडा खुले कारागृहात सुधारणा व पुनर्वसन उपक्रमांतर्गत देशी खिलार जातीच्या सहा गायी व एक बैल भेट देण्यात आला. आषाढी वारीनिमित्त ५० ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ ग्रंथांचेही बंदीजनांना वाटप करण्यात आले. सामाजिक, आध्यात्मिक आणि स्वावलंबनाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

Jul 6, 2026 - 03:35
 0  26
येरवडा खुले कारागृहात गाई भेट आणि ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ वाटप; सुधारणा व पुनर्वसनाला नवी दिशा
येरवडा खुले कारागृह, सार्थ ज्ञानेश्वरी, गाई भेट,

पुणे | मनिषा गुरव :- चीफ एडिटर

महाराष्ट्र कारागृह विभागाच्या "सुधारणा व पुनर्वसन" या उद्दिष्टाला बळकटी देण्यासाठी येरवडा खुले कारागृह, पुणे येथे रविवारी सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत कारागृहाला देशी खिलार जातीच्या सहा गायी व एक बैल भेट देण्यात आला, तसेच आषाढी वारीनिमित्त बंदीजनांना ५० ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ ग्रंथांचे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह) डॉ. सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई तसेच पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रसिद्ध वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर (आनंदी वास्तू) आणि गुरुजी श्रीनंद पिंपळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून डॉ. नीलू शेलार, बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट, पुणे तसेच आनंद साळुंके व भाग्यश्री साळुंके (आर. के. फाऊंडेशन, पुणे) यांच्या सहकार्याने देशी खिलार जातीच्या सहा गायी आणि एक बैल येरवडा खुले कारागृहाला भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे बंदीजनांच्या सुधारणा व पुनर्वसन प्रक्रियेला चालना मिळण्याबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून गोपालनाला प्रोत्साहन मिळणार असून स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

याच कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखक लक्ष्मण सूर्यभान घुगे यांनी बंदीजनांना ५० ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ ग्रंथ भेट देत अध्यात्म, नैतिक मूल्ये आणि संत विचारांचा वारसा आत्मसात करण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमास आनंद पिंपळकर, श्रीनंद पिंपळकर, लेखक लक्ष्मण घुगे, आनंद साळुंके, भाग्यश्री साळुंके, प्रणव साळुंके, डॉ. नीलू शेलार तसेच रोटरी ईस्टच्या अध्यक्षा अलका ओसवाल उपस्थित होत्या. येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी नागेश कांबळे, तुरुंग अधिकारी नागनाथ भानवसे, निशा श्रेयकर, सुभेदार चंद्रकांत खांदवे, सुनील गायकवाड, हवालदार राजेंद्र धनगर, दत्तात्रय मोडक, प्रकाश भोसले, राकेश पवार, महेश हळदकर, याकूब शेख, महेंद्र लोहकरे, अशोक होले, मोहसीन जमादार, मीना पोटकुले, सरला साबळे, मोनिका लांडगे, संध्या जाधवर, संतोषी हिंगे, ऐश्वर्या यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने बंदीजन उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी गोसेवा, अध्यात्म आणि पुनर्वसन यांचा समन्वय साधणारे असे उपक्रम बंदीजनांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0