प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्यातून जनतेचा विश्वास संपादन करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

नागरी सेवेत प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि लोकाभिमुखता या मूल्यांना प्राधान्य देऊन जनतेचा विश्वास संपादन करा, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यशदा पुणे येथे केले.

Sep 11, 2026 - 23:43
 0  4
प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्यातून जनतेचा विश्वास संपादन करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
जिष्णु देव वर्मा, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, यशदा पुणे, परिविक्षाधीन प्रशिक्षण, नागरी सेवा, प्रशासकीय अधिकारी, लोकाभिमुख प्रशासन, प्रामाणिकपणा, महाराष्ट्र प्रशासन, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण,

प्रतिनिधीनरेश शिंदे 

यशदा येथे एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. १० : नागरी सेवेत कार्यरत असताना देशाच्या राज्यघटनेला सर्वोच्च प्राधान्य देतानाच प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, लोकाभिमुखता आणि योग्य निर्णय घेण्याचे धैर्य या मूल्यांना आपल्या कार्याचा आधार बनवा. जनतेचा विश्वास संपादन करणे हीच प्रशासकीय कारकिर्दीची खरी कसोटी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे आयोजित एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. यावेळी यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे, अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, यशदाच्या सीपीटीपी विभागाच्या प्रमुख पौर्णिमा गायकवाड, सहायक प्राध्यापक तथा संचालक प्रांजली खडसे आणि सहायक प्राध्यापक शमा पवार उपस्थित होते.

प्रशासनात चारित्र्य आणि नैतिक मूल्ये महत्त्वाची

प्रशिक्षणादरम्यान कायदे, नियम, कार्यपद्धती, तंत्रज्ञान आणि प्रशासनाच्या विविध पैलूंचे ज्ञान मिळविण्यासोबतच स्वतःचे चारित्र्य घडविणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे राज्यपाल वर्मा यांनी सांगितले.

नागरिकांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा तसेच प्रशासनावर येणाऱ्या विविध दबावांना सामोरे जाताना जनतेचा विश्वास संपादन करणे आणि तो कायम टिकवून ठेवणे आवश्यक आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही राज्यघटनेतील मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न राहता दैनंदिन प्रशासनाचा भाग झाली पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आर्थिक गैरव्यवहारासोबत पक्षपात आणि अधिकारांचा गैरवापरही टाळा

प्रामाणिकपणाबाबत कोणतीही तडजोड करू नका, असे आवाहन करताना राज्यपालांनी प्रशासनातील विविध गैरप्रकारांकडे लक्ष वेधले. आर्थिक गैरव्यवहारासोबतच पक्षपात, अधिकारांचा गैरवापर, भेदभाव, हितसंबंधांचा संघर्ष आणि जाणीवपूर्वक होणारा विलंब यामुळेही प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात येते, असे त्यांनी सांगितले.

कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांसाठी प्रामाणिकपणासोबतच दयाळूपणा, नागरिकांसाठी उपलब्धता, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि सहानुभूती हे गुणही आवश्यक असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

जनतेमध्ये जाऊन प्रशासन समजून घ्या

अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून प्रशासन न करता प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन काम करावे, असे आवाहन राज्यपाल वर्मा यांनी केले. गाव, शाळा आणि आरोग्य केंद्रांना भेटी देऊन शेतकरी, कामगार, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच वंचित घटकांशी संवाद साधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेतल्यास प्रशासन अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख पद्धतीने राबविता येईल, असे त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञानासोबत प्रशासनाला मानवी चेहरा आवश्यक

कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रशासन अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यावर भर देण्याचे आवाहन राज्यपालांनी केले.

मात्र तंत्रज्ञानाचा वापर करताना प्रशासनाचा मानवी चेहरा कायम राहणे आवश्यक आहे. डिजिटल सुविधा नागरिकांसाठी खरोखरच सोयीच्या ठरतील आणि त्यांचा वापर सर्वसामान्यांना सहज करता येईल, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

विकसित भारत २०४७ साठी सक्षम प्रशासन आवश्यक

‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी योग्य धोरणांसोबतच त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणारे तत्पर आणि कार्यक्षम प्रशासन आवश्यक आहे, असे राज्यपाल वर्मा यांनी सांगितले.

प्रशासकीय कारकिर्दीत आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास वैयक्तिक हितापेक्षा संवैधानिक मूल्यांना आणि नागरिकांशी न्याय्य वर्तनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

तंत्रज्ञान, AI आणि डेटा आधारित प्रशासनावर यशदाचा भर

यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले की, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा आधारित शासन, पर्यावरणीय आव्हाने आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे प्रशासनाचे स्वरूप वेगाने बदलत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये आजीवन शिकण्याची वृत्ती, नैतिक नेतृत्व आणि लोकसेवेची भावना विकसित करणे आवश्यक आहे.

यशदा आता केवळ प्रशिक्षण संस्थेपुरती मर्यादित न राहता ‘लर्निंग फॅसिलिटेटर’ म्हणून कार्य करीत आहे. प्रशिक्षणासोबत संशोधन, सल्लागार सेवा, सहयोग आणि ज्ञान व्यवस्थापनाची सांगड घालण्यात आली असून यासाठी तीन आंतर-विभागीय प्रभाग आणि आठ उत्कृष्टता केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

तंत्रज्ञान प्रशासनाला गती देऊ शकते; मात्र सहानुभूतीमुळे प्रशासनाला मानवी चेहरा मिळतो, असे डॉ. दिवसे यांनी नमूद केले.

सक्षम आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी घडविण्याचे यशदाचे ध्येय

सीपीटीपी विभागाच्या प्रमुख पौर्णिमा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सक्षम, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी घडविणे हे यशदाचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते सीपीटीपीच्या संकेतस्थळाचे अनावरण तसेच प्रशिक्षण मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.