नाशिक–पुणे रेल्वेसाठी रस्त्यावर उतरण्याचे आमदार सत्यजीत तांबे यांचे आवाहन; ९ ऑगस्टला जनआंदोलनाची घोषणा
नाशिक–पुणे रेल्वे मार्गासाठी आता जनआंदोलनाची गरज असल्याचे सांगत आमदार सत्यजीत तांबे यांनी ९ ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त व्यापक आंदोलनाची घोषणा केली. समृद्धी महामार्ग कनेक्टरच्या रखडलेल्या कामावरही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
नाशिक ब्यूरो
नाशिक | ६ जुलै २०२६ : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा विषय नसून नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या रेल्वेमार्गासाठी आता सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारण्याची वेळ आली आहे, असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी त्यांनी जाहीर केले की, ९ ऑगस्ट क्रांतीदिनाच्या निमित्ताने नाशिक–पुणे रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी व्यापक जनआंदोलन छेडण्यात येणार असून नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व नागरिक, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन या प्रकल्पासाठी आवाज उठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार तांबे म्हणाले की, नाशिक आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान थेट रेल्वेमार्ग नसल्यामुळे अवघ्या १५० किलोमीटरच्या अंतरासाठी नागरिकांना मोठा वळसा घालावा लागतो. रस्ते वाहतुकीवरील वाढता ताण, वाहतूक कोंडी आणि सात ते आठ तासांचा प्रवास यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चाकण मार्गावरील वाहतूक अडथळ्यांमुळे ही समस्या अधिक गंभीर झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
रेल्वे प्रकल्पाबाबत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका करत त्यांनी मूळ अपेक्षित मार्गाऐवजी शिर्डीमार्गे नियोजन करण्यात आल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले. "पुण्याहून पुणतांबा" या म्हणीचा उल्लेख करत त्यांनी या नियोजनावर उपरोधिक भाष्य केले.
लोकशक्तीच्या माध्यमातून शासनावर प्रभावी दबाव निर्माण केल्यासच हा प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करत विविध ठिकाणी रस्ता रोकोसह विविध प्रकारची आंदोलने करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
समृद्धी महामार्ग कनेक्टरवरही सरकारला धारेवर
आमदार तांबे यांनी समृद्धी महामार्गाच्या नाशिक कनेक्टरच्या रखडलेल्या कामावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. नाशिक ते साकूर फाटा या सुमारे ५०० कोटी रुपयांच्या कनेक्टर प्रकल्पासाठी भूसंपादन पूर्ण होऊन निधी मंजूर असतानाही अद्याप निविदा प्रक्रिया सुरू झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
यामुळे नाशिककरांना समृद्धी महामार्गाचा अपेक्षित लाभ मिळत नसून मुंबई–आग्रा महामार्ग आणि समृद्धी महामार्ग असे दोन टोल भरावे लागत आहेत. तसेच भरवीर टोलनाक्यापर्यंत पोहोचण्यासाठी होणारी वाहतूक कोंडी नागरिकांच्या वेळ आणि पैशाचा अतिरिक्त भार वाढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इंडियाबुल्स आंदोलनाचा दाखला
नाशिकमधील इंडियाबुल्स प्रकल्पाच्या प्रश्नावर नागरिकांच्या सहभागातून उभारलेल्या आंदोलनामुळे शासनाला निर्णय घ्यावा लागला आणि प्रकल्पाला गती मिळाली, असा दाखला देत आमदार तांबे म्हणाले की, नाशिक–पुणे रेल्वे प्रकल्पासाठीही अशाच लोकशक्तीची गरज आहे.
केवळ निवेदने देऊन हा प्रश्न सुटणार नाही. नागरिक, सामाजिक संघटना आणि सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी एकत्र आल्यास शासनावर प्रभावी दबाव निर्माण होईल आणि रेल्वे प्रकल्पाला गती मिळेल. त्यामुळे ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनआंदोलनात नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0