नाशिक जिल्ह्यात ३० जूनपासून मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राजकीय पक्षांनी BLA नियुक्त करावेत : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यात ३० जून २०२६ पासून मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू होणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देणार असून राजकीय पक्षांनी बूथ लेव्हल असिस्टंट (BLA) नियुक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
नाशिक ब्यूरो
नाशिक, दि. २६ : भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली असून नाशिक जिल्ह्यात ३० जून २०२६ पासून ही मोहीम सुरू होणार आहे. या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देणार असून मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. राजकीय पक्षांनीही प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल असिस्टंट (BLA) नियुक्त करावेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, या विशेष मोहिमेचा उद्देश मतदार याद्यांमधील दुबार, मृत, कायमचे स्थलांतरित आणि बोगस मतदारांची नावे वगळणे, अपात्र किंवा परदेशी नागरिकांचा समावेश रोखणे तसेच नवीन आणि पात्र मतदारांची नोंदणी करून एकही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये हा आहे.
विशेष सखोल पुनरीक्षणाचे वेळापत्रक
अर्हता दिनांक: १ ऑक्टोबर २०२६
तयारी, प्रशिक्षण व छपाई: २० ते २९ जून २०२६
BLO मार्फत घरोघरी भेटी: ३० जून ते २९ जुलै २०२६
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण: २९ जुलै २०२६ पर्यंत
प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी: ५ ऑगस्ट २०२६
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी: ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६
दावे-हरकतींची सुनावणी व निकाली काढणे: ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी: ७ ऑक्टोबर २०२६
या मोहिमेदरम्यान प्रत्येक मतदाराला प्रगणना अर्जाच्या दोन प्रती देण्यात येतील. दुसऱ्या भेटीत भरलेला अर्ज स्वीकारून त्याची एक प्रत मतदाराला दिली जाईल. घर बंद असल्यास अर्ज घरात टाकण्यात येईल आणि त्यानंतर तीन वेळा भेट देऊनही प्रतिसाद न मिळाल्यास पंचनामा केला जाईल.
मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचे आढळल्यास संबंधितांचा जबाब नोंदवून आवश्यक अर्ज भरून मतदाराचे नाव संबंधित मतदारसंघात हस्तांतरित करण्याची कार्यवाही केली जाईल. अपूर्ण पत्ता किंवा मतदार सापडत नसल्यास बूथ लेव्हल असिस्टंटच्या मदतीने शोध घेण्यात येईल. आवश्यक तपासणीनंतर नियमांनुसार मतदाराचे नाव वगळण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील नागरिक, राजकीय पक्ष आणि सर्व संबंधितांनी या विशेष पुनरीक्षण मोहिमेस सक्रिय सहकार्य करून मतदार यादी अधिक अचूक आणि विश्वासार्ह करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0