अतिवृष्टीचा फटका: आळंदीकडे जाणारे सर्व मार्ग बंद; वारकरी व नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन
अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून आळंदी व देहू परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने वारकरी, दिंडी प्रमुख आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले असून अनेक पूल, अंडरपास आणि रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
पुणे प्रतिनिधी: रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड : मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून आळंदी व देहू परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंदिर परिसर, धर्मशाळा आणि नदीकाठच्या भागात पाणी शिरल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सर्व वारकरी, दिंडी प्रमुख आणि भाविकांना सध्या ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना नदी, पूल किंवा पाण्याखाली गेलेल्या मार्गांवरून जाण्याचा प्रयत्न करू नये तसेच प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट केले आहे. परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच पुढील प्रवासाबाबत अधिकृत सूचना दिली जाईल, असेही प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने दुपारी १२ वाजेपर्यंतची वाहतूक स्थिती जाहीर केली आहे. शहरातील अनेक रस्ते, अंडरपास आणि पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दिघी-आळंदी वाहतूक विभागात इंद्रायणी नदीवरील जुना व नवा पूल, सिद्धबेट पूल, दाभाडे सरकार चौक पूल तसेच मरकळ गावातील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच श्री क्षेत्र आळंदी येथे सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
चाकण विभागातील वाकी फाटा, वाकडमधील ताथवडे अंडरपास आणि थेरगाव रिव्हर व्ह्यू पूल, पिंपरीतील वल्लभनगर व साई चौक अंडरपास, सांगवीतील एमएम चौक, साई चौक आणि रहाटणी पूल, म्हाळुंगेतील आळंदी फाटा व केबीएम कंपनीजवळील नाला पूल, तसेच चिखली, देहूरोड आणि हिंजवडी परिसरातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
भोसरी, बावधन, निगडी, तळेगाव, चिखली, हिंजवडी आणि इतर भागांतील अनेक चौक, अंडरपास व सेवा रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू असून काही ठिकाणी पर्यायी मार्गांचा वापर केला जात आहे.
प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून वाहन चालवू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः वारकरी, भाविक आणि पर्यटकांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्रवास टाळावा, असेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0