पुणे-लोणावळा तिसऱ्या-चौथ्या रेल्वे ट्रॅकच्या प्रस्तावातील त्रुटी तातडीने दुरुस्त करा; खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे बोर्डाकडे मागणी

पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे ट्रॅकच्या प्रस्तावातील त्रुटी तातडीने दूर करून परिपूर्ण प्रस्ताव रेल्वे बोर्डाने मंजुरीसाठी पुढे पाठवावा, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे बोर्डाचे निदेशक फखरुद्दीन अली अहमद यांच्याकडे केली. प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळाल्यास पुढील चार ते पाच महिन्यांत प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला गती मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.

Jul 2, 2026 - 05:16
 0  2
पुणे-लोणावळा तिसऱ्या-चौथ्या रेल्वे ट्रॅकच्या प्रस्तावातील त्रुटी तातडीने दुरुस्त करा; खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे बोर्डाकडे मागणी
श्रीरंग बारणे, पुणे लोणावळा रेल्वे, तिसरा चौथा ट्रॅक, रेल्वे बोर्ड,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे ट्रॅकच्या प्रस्तावातील त्रुटी तातडीने दूर करून परिपूर्ण प्रस्ताव रेल्वे बोर्डाने मंजुरीसाठी पुढे पाठवावा, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे बोर्डाचे निदेशक फखरुद्दीन अली अहमद यांच्याकडे केली आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या भेटीदरम्यान खासदार बारणे यांनी रेल्वे बोर्डाच्या निदेशकांना सविस्तर निवेदन सादर केले. पुणे-लोणावळा मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या प्रस्तावात मध्य रेल्वेने काही त्रुटी नोंदवल्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा रेल्वे बोर्डाकडे आला असून, त्या त्रुटी तातडीने दूर करून प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी पाठविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

सध्या पुणे-लोणावळा दरम्यान ६०.५९ किलोमीटर अंतरावर धावणाऱ्या उपनगरीय लोकलच्या दररोज ४४ फेऱ्या होतात. या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांची मोठी वर्दळ असल्याने उपनगरीय रेल्वेसाठी स्वतंत्र ट्रॅकची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. खासदार बारणे यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल्पाला २०१७ मध्ये मंजुरी मिळाली.

मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या या प्रकल्पाची अंदाजित किंमत ५,१०० कोटी रुपये असून त्यामध्ये जमीन अधिग्रहण खर्चाचाही समावेश आहे. प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रत्येकी ५०.५० टक्के आर्थिक सहभाग उचलणार असून, राज्य शासनाचा वाटा सुमारे २,५५० कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातही निधीची तरतूद करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असली तरी मध्य रेल्वेने काही त्रुटी निदर्शनास आणल्या आहेत. त्यामुळे प्रस्ताव पुन्हा रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव नीती आयोगाकडे जाईल. त्यानंतर केंद्र सरकार आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अंदाजे चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे रेल्वे बोर्डाने प्रस्तावातील सर्व त्रुटी तातडीने दूर करून परिपूर्ण प्रस्ताव पुढे पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली.

बारणे यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाला गती मिळाली, तर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या आर्थिक सहभागासाठी आवश्यक निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामाला लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0