तात्या बापट स्मृती समितीच्या ‘भारत माता भवन’ वास्तुवृद्धीचा शुभारंभ; खासदार श्रीरंग बारणे यांचा ५० लाखांचा निधी

चिंचवड येथील भारत माता भवनच्या वास्तुवृद्धीच्या कामाचा शुभारंभ खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाला. दोन नवीन मजल्यांसाठी ५० लाखांचा खासदार निधी.

तात्या बापट स्मृती समितीच्या ‘भारत माता भवन’ वास्तुवृद्धीचा शुभारंभ; खासदार श्रीरंग बारणे यांचा ५० लाखांचा निधी
तात्या बापट स्मृती समिती, भारत माता भवन, श्रीरंग बारणे, चिंचवड, पिंपरी चिंचवड,

प्रतिनिधी:रोहन सोनाळे 

पिंपरी : चिंचवड येथील स्वर्गीय तात्या बापट स्मृती समिती संचलित ‘भारत माता भवन’च्या वास्तुवृद्धीच्या कामाचा शुभारंभ खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभहस्ते रविवारी करण्यात आला. या वास्तूवर आणखी दोन नवीन मजले बांधण्यात येणार असून, या विस्तारकामासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी खासदार निधीतून ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आवश्यकतेनुसार यापुढेही अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही बारणे यांनी यावेळी दिली.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक मुकुंदराव कुलकर्णी, प्रांत संपर्क प्रमुख मिलिंदराव देशपांडे, पिंपरी-चिंचवड शहर संघचालक विनोद बन्सल, संघ अधिकारी विनायकराव थोरात, महापालिकेच्या ‘ब’ प्रभागाचे अध्यक्ष मंदार देशपांडे, प्रकल्प आर्किटेक्ट उदय कुलकर्णी, जयदीप खापरे, रवी नामदे, उदय हळदीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने कार्यरत असलेल्या स्वर्गीय तात्या बापट स्मृती केंद्राच्या कार्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी कौतुक केले. पूर्वांचलातील विद्यार्थ्यांना येथे आणून त्यांना शिक्षणासोबतच भारतीय संस्कृती, संस्कार आणि राष्ट्रीय मूल्यांची ओळख करून देण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

“पूर्वांचल राज्यातील विद्यार्थ्यांना येथे आणून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले जातात. भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचे मोठे कार्य या माध्यमातून होत आहे. देशाची अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्यासाठी ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून मोलाचे योगदान देत आहे,” असे खासदार बारणे यांनी सांगितले.

‘भारत माता भवन’मधील वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा तसेच निवासाचा खर्च उचलून त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम केले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि शैक्षणिकदृष्ट्या पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भवनाच्या विस्ताराचे काम महत्त्वाचे ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील आदिवासी भाग तसेच पूर्वांचलातील राज्यांच्या विकासाला प्राधान्य दिले असल्याचे बारणे यांनी सांगितले. त्याच धर्तीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील आदिवासी घटक तसेच सामाजिक संस्थांना सातत्याने सहकार्य केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

यापूर्वी कर्जत तालुक्यातील आदिवासी भवनासाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून, संबंधित संस्थेला रुग्णवाहिकादेखील उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती खासदार बारणे यांनी दिली.

‘भारत माता भवन’च्या वास्तुवृद्धीमुळे संस्थेच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि संस्कारक्षम उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा वाढविण्यासोबतच भारतीय संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या मूल्यांचा प्रसार करण्याच्या संस्थेच्या कार्याला या विस्तारामुळे बळ मिळणार आहे.

फोटो ओळ : चिंचवड येथील स्वर्गीय तात्या बापट स्मृती समिती संचलित ‘भारत माता भवन’च्या वास्तुवृद्धीच्या कामाचा शुभारंभ करताना डावीकडून रवी नामदे, खासदार श्रीरंग बारणे, मुकुंदराव कुलकर्णी, मंदार देशपांडे, विनोद बन्सल, विनायकराव थोरात आदी.