संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज; मुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा
संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. पंचगंगा नदीची वाढती पाणीपातळी लक्षात घेऊन स्थलांतर, बचाव आणि मदतकार्याबाबत विशेष नियोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर प्रतिनिधी उमेश जाधव
कोल्हापूर | ६ जुलै २०२६ : राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून आपत्कालीन प्रतिसादासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत दिली.
मुंबईतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरप्रवण आणि पूरबाधित जिल्ह्यांच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पंचगंगा नदीची वाढती पाणीपातळी, बचाव आणि मदतकार्याची तयारी, संभाव्य स्थलांतराचे नियोजन तसेच विविध विभागांनी केलेल्या पूर्वतयारीची सविस्तर माहिती सादर केली.
जिल्हास्तरीय आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सांगितले की, ३ जुलैपासून जिल्ह्यात सरासरी ५० मिमी पावसाची नोंद होत असून पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत दर २४ तासांत सुमारे ६ ते ७ फुटांनी वाढ होत आहे. डोंगरमाथा परिसरातील पावसाचे पाणी अद्याप नदीपात्रात येत असून घाटमाथ्यावर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुढील २४ ते ४८ तासांत पंचगंगा नदी
इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विभागांनी आपत्कालीन प्रतिसादासाठी पूर्ण सज्ज राहावे, असे निर्देश देण्यात आले. जीवितहानी टाळणे हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करत कोल्हापूर शहरासह नदीकाठच्या सखल भागातील वस्त्यांचे आवश्यकतेनुसार वेळेत स्थलांतर करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
दरवर्षी पूरग्रस्त होणारी गावे तसेच पाण्यामुळे संपर्क तुटणाऱ्या रस्त्यांजवळ आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री, बचाव बोटी आणि अन्य आवश्यक साधनसामग्री अगोदरच उपलब्ध ठेवण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले. तसेच पूर नियंत्रणासाठी विविध विभागांमध्ये समन्वय राखून तातडीने प्रतिसाद देण्यावर भर देण्यात आला.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पाटोळे, संबंधित विभागांचे कार्यकारी अभियंते तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी 'शून्य जीवितहानी' हे उद्दिष्ट ठेवून जलद प्रतिसाद प्रणाली प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. पूर नियंत्रण, बचाव आणि मदतकार्याशी संबंधित सर्व पथकांनी २४ तास सतर्क राहून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पुढील दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे मानले जात असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, नदीकाठ आणि सखल भागात अनावश्यक वावर टाळण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
1
Wow
0