पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' शेतकऱ्यांसाठी नवी उभारी; शाश्वत कृषी विकासावर शासनाचा भर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' ही केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना नव्याने आर्थिक बळ देत शाश्वत कृषी विकासाचा मार्ग मोकळा करणारी योजना असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.

Jul 4, 2026 - 00:25
 0  3
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' शेतकऱ्यांसाठी नवी उभारी; शाश्वत कृषी विकासावर शासनाचा भर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

कोल्हापूर | प्रतिनिधी उमेश जाधव 

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' ही केवळ थकीत कर्ज माफ करण्याची योजना नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना नव्याने उभारी देणारा व्यापक उपक्रम असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. कर्जमुक्तीबरोबरच शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि शाश्वत करण्यासाठी शासनाने दीर्घकालीन उपाययोजनांवर विशेष भर दिला आहे.

शासनाच्या मते, कर्जमाफी हा शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा देणारा उपाय असला तरी तो कायमस्वरूपी समाधान नाही. त्यामुळे सिंचन सुविधांचा विस्तार, प्रभावी पीकविमा योजना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, साठवणूक व प्रक्रिया उद्योगांना चालना, शेतमालाला योग्य आणि हमीभाव, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे (एफपीओ) बळकटीकरण तसेच कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित धोरण यांसारख्या उपक्रमांवर भर देण्यात येत आहे.

या उपाययोजनांमुळे शेती अधिक उत्पादनक्षम, स्पर्धात्मक आणि टिकाऊ होण्यास मदत होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हातात पैसा आल्याने ग्रामीण बाजारपेठ, कृषी सेवा, वाहतूक, प्रक्रिया उद्योग आणि इतर पूरक व्यवसायांनाही गती मिळून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

आधार प्रमाणीकरण आवश्यक

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात असून लाभाचे वितरण पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती संबंधित बँकांकडून शासनाच्या प्रणालीवर अपलोड करण्यात येत आहे. प्रत्येक पात्र कर्ज खात्याला स्वतंत्र क्रमांक दिल्यानंतर आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात शासनाकडून थेट लाभाची रक्कम जमा केली जाणार आहे.

त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपली आधार माहिती संबंधित बँक खात्याशी संलग्न (लिंक) करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करावी, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.

शेतकऱ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी

सहकार विभागाने शेतकरी बांधवांना शासनाच्या अधिकृत सूचना, संबंधित बँका आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार सर्व आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. आधार प्रमाणीकरण, बँक खात्याची माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रे पूर्ण केल्यास योजनेचा लाभ लवकर मिळू शकणार आहे.

शासनाच्या मते, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून शेतकरी सक्षम करणे, शेती समृद्ध करणे आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

– वृषाली पाटील

सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0