महापौर सुजाता पाटील यांची दुर्घटनास्थळांना भेट; पावसाळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा, तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी बेलापूर, वाशी आणि महापे परिसरातील दुर्घटनास्थळांना भेट देत पावसाळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. इमारतींची स्ट्रक्चरल तपासणी, धोकादायक भाग हटविणे, नालेसफाई आणि झाडे हटविण्याच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नवी मुंबई प्रतिनिधी | देवानंद शिंदे
नवी मुंबई | ६ जुलै २०२६ : नवी मुंबईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर श्रीमती सुजाता पाटील यांनी बेलापूर, वाशी आणि महापे परिसरातील दुर्घटनास्थळांना भेट देत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. प्रभावित नागरिकांशी संवाद साधून त्यांना दिलासा देतानाच आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
बेलापूरमधील अविघ्न सोसायटीची पाहणी
४ जुलै रोजी सेक्टर-१९, शहाबाज गाव, बेलापूर येथील अविघ्न सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली होती. या इमारतीत १७ कुटुंबे राहत होती. दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सर्व कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. काही कुटुंबे नातेवाईकांकडे गेली असून एक कुटुंब महानगरपालिकेच्या वारकरी भवन येथील तात्पुरत्या निवारा केंद्रात राहत आहे.
महापौर सुजाता पाटील यांनी रहिवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. इमारतीची स्ट्रक्चरल तपासणी पूर्ण झाल्यानंतरच आवश्यक सामान काढण्यासाठी परवानगी दिली जाईल, जेणेकरून कोणतीही पुढील दुर्घटना टाळता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेमार्फत तपासणी तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. सध्या इमारतीचे प्रवेशद्वार सिलबंद करण्यात आले असून सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
वाशीतील दुर्घटनास्थळाची पाहणी
५ जुलै रोजी सेक्टर-११, जुहूगाव (वाशी) येथील गीता अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील बाहेरील स्लॅब आणि ग्रील रस्त्यावर कोसळून राजेश शेट्टी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनास्थळी भेट देऊन महापौरांनी इमारतीतील धोकादायक भाग तातडीने हटविण्याचे तसेच बाहेरील ग्रील त्वरित काढून टाकण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
महापे एमआयडीसी आणि ठाणे-बेलापूर मार्गाची पाहणी
महापे एमआयडीसी पोलीस चौकीसमोरील पाणी साचलेल्या भागाची पाहणी करत महापौरांनी जेसीबीच्या साहाय्याने सुरू असलेल्या नाल्याचे पात्र रुंद करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर ठाणे-बेलापूर मार्गावरील परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी दिघ्यापर्यंत पाहणी केली. ग्रीनवर्ल्ड नाल्याच्या प्रवाहाचीही उपमहापौर दशरथ भगत यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली.
झाडे हटविण्याच्या कामांना गती देण्याचे निर्देश
गेल्या तीन दिवसांतील मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे नवी मुंबईत अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. ही पडलेली झाडे तातडीने हटवून वाहतूक आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कामांना वेग देण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
नागरिकांना आवाहन
महापौर सुजाता पाटील यांनी नवी मुंबईकरांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, झाडाखाली उभे राहू नये तसेच झाडाखाली वाहने उभी करू नयेत, असे आवाहन केले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या १८००२२२३०९ आणि १८००२२२३१० या टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
3
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
3