पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या; जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन, १०४ टोल-फ्रीवर आरोग्य मदत उपलब्ध

गडचिरोली जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, कॉलरा व इतर जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचा वाढता धोका लक्षात घेऊन नागरिकांना विशेष आरोग्य दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. स्वच्छता, उकळलेले पाणी, डासांपासून संरक्षण आणि ताप आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Jul 7, 2026 - 20:28
 0  1
पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या; जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन, १०४ टोल-फ्रीवर आरोग्य मदत उपलब्ध
पावसाळा, आरोग्य, गडचिरोली, जिल्हा प्रशासन, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड,

गडचिरोली | दि. ७ जुलै २०२६

पावसाळ्याच्या आगमनासोबत ताप, सर्दी-खोकला, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, कॉलरा यांसारख्या जलजन्य व कीटकजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी विशेष आरोग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन गडचिरोली जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हाभर विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप कशदे यांनी सांगितले की, पावसाळ्यात आजारांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी पिण्याचे पाणी नेहमी उकळून व गाळूनच प्यावे. घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, कारण साचलेल्या पाण्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची पैदास होते. तसेच वैयक्तिक स्वच्छता राखून ताजे व गरम अन्न सेवन करणे आरोग्यासाठी हितावह असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी नागरिकांना ताप अंगावर काढू नये, असे स्पष्ट आवाहन केले आहे. ताप, पुरळ, उलट्या, जुलाब, सांधेदुखी किंवा तीव्र डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास कोणताही विलंब न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःहून औषधे घेणे टाळावे, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाबाबत कडक निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक विहिरी, बोअरवेल आणि नळ पाणीपुरवठा योजनांमधील पाण्याचे टीसीएल (TCL) वापरून नियमित शुद्धीकरण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच ग्रामसेवक आणि सरपंचांनी पाणी साठवणुकीच्या स्रोतांची नियमित स्वच्छता राखून पाण्याची गुणवत्ता (OT Test) तपासल्यानंतरच नागरिकांना सुरक्षित पाणीपुरवठा करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील जारी केल्या आहेत. झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, पूर्ण अंग झाकणारे कपडे घालणे, डासप्रतिबंधक क्रीम किंवा स्प्रे वापरणे, बाहेरून आल्यावर हात-पाय साबणाने धुणे, पावसात भिजल्यानंतर अंघोळ करणे आणि घर, स्वयंपाकघर व शौचालय स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

पिण्याच्या पाण्याबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन करताना आरोग्य विभागाने सांगितले की, उकळून, गाळून आणि शुद्ध केलेले पाणीच वापरावे. अशा पद्धतीने पाणी शुद्ध केल्यास कॉलरा, टायफॉईड यांसारख्या गंभीर आजारांपासून प्रभावी संरक्षण मिळते. शुद्ध पाणी स्वच्छ व झाकलेल्या भांड्यातच साठवून ठेवावे, जेणेकरून ते पुन्हा दूषित होणार नाही.

अधिक माहितीसाठी किंवा आरोग्यविषयक मदतीसाठी नागरिकांनी टोल-फ्री क्रमांक १०४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0