समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गडचिरोली जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळांना यंदा विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी सर्व जागा भरल्या. २१० जागांसाठी ४९८ अर्ज प्राप्त झाले असून प्रतीक्षा यादीही तयार करण्यात आली आहे.
गडचिरोली : समाज कल्याण विभागाच्या गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांना यंदा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी सर्व जागा भरल्या असून २१० जागांसाठी तब्बल ४९८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
जिल्ह्यात नेवेगाव व वांगेपल्ली (अहेरी) येथे मुलांसाठी तर सिरोंचा येथे मुलींसाठी समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध असून प्रत्येक वर्गासाठी ४० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे. प्रवेशासाठी १५ मे रोजी यादी जाहीर करण्यात आली होती.
राज्यात अनेक ठिकाणी शासकीय शाळांमधील पटसंख्या घटत असताना गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळांना मिळणारा ‘हाऊसफुल’ प्रतिसाद विशेष उल्लेखनीय मानला जात आहे.
या निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, भोजन, क्रीडा साहित्य, संगणक सुविधा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच डिजिटल शिक्षण यांसारख्या सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे पालकांचा या शाळांकडे ओढा वाढत असल्याचे दिसून येत आहे.
यंदा प्राप्त झालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे प्रतीक्षा यादीदेखील तयार करण्यात आली आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तसेच विविध क्रीडा प्रकारांमध्ये ९८ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग गडचिरोली डॉ. सचिन मडावी यांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

