पावसाच्या पाण्यातून किंवा चिखलातून चाललात? लेप्टो संसर्ग टाळण्यासाठी ७२ तासांत प्रतिबंधात्मक उपचार घ्या – बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) संसर्गाबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचे साचलेले पाणी किंवा चिखलातून चाललेल्या नागरिकांनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई प्रतिनिधी : नरेश शिंदे
मुंबई | दि. ६ जुलै २०२६
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यातून किंवा चिखलातून चालणाऱ्या नागरिकांमध्ये लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) या गंभीर आजाराचा धोका वाढला आहे. विशेषतः शरीरावर जखम, खरचटलेला भाग किंवा पायाला जखम असताना अशा पाण्याशी संपर्क आल्यास संसर्गाची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने केले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यात लेप्टोस्पायरा हे जीवाणू असू शकतात. दूषित पाण्याचा संपर्क शरीरावरील अगदी छोट्या जखमेशी किंवा खरचटलेल्या भागाशी आल्यास हे जीवाणू शरीरात प्रवेश करून लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होऊ शकतो.
लेप्टोस्पायरोसिस हा गंभीर आजार असून वेळेवर उपचार न झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे पावसाच्या पाण्यातून किंवा चिखलातून चाललेल्या प्रत्येक नागरिकाने विलंब न करता वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करून घ्यावेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने, आरोग्य केंद्रे, महानगरपालिका दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी, मार्गदर्शन आणि आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांनी स्वतःसोबतच आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवारालाही याबाबत जागरूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाने पावसाळ्यात कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष करू नये, असेही स्पष्ट केले आहे. कारण पावसाळ्यातील ताप हा डेंग्यू, मलेरिया किंवा लेप्टोस्पायरोसिस यापैकी कोणत्याही आजाराचे लक्षण असू शकते. त्यामुळे ताप, अंगदुखी किंवा इतर लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
लेप्टोपासून बचावासाठी महत्त्वाच्या सूचना
पायावर जखम किंवा खरचटलेला भाग असल्यास साचलेल्या पाण्यातून जाणे टाळा.
आवश्यक असल्यास गमबूट किंवा जलरोधक पादत्राणे वापरा.
पावसाच्या पाण्यातून चालून आल्यानंतर पाय साबणाने स्वच्छ धुवा आणि पूर्णपणे कोरडे करा.
ताप किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वैद्यकीय सल्ल्यानुसार २४ ते ७२ तासांच्या आत प्रतिबंधात्मक औषधोपचार अवश्य घ्या.
पावसाळ्यात योग्य काळजी, स्वच्छता आणि वेळेवर उपचार केल्यास लेप्टोस्पायरोसिससारख्या गंभीर आजारांपासून प्रभावी संरक्षण मिळू शकते, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0