कुर्ला मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी 'एल' विभागाच्या सहायक आयुक्तांसह चौघे निलंबित; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
कुर्ला-साकीनाका येथील मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी 'एल' विभागाच्या सहायक आयुक्तांसह चार अधिकाऱ्यांना चौकशीसापेक्ष निलंबित केले आहे. तसेच सात दिवसांत अहवाल सादर करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई | प्रतिनिधी | नरेश शिंदे
२ जुलै २०२६ : कुर्ला-साकीनाका परिसरातील खैरानी मार्गावर मॅनहोलवर संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू असताना एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेची बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार 'एल' विभागाचे सहायक आयुक्तांसह चार अधिकाऱ्यांना चौकशीसापेक्ष निलंबित करण्यात आले असून, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रचालन खात्यामार्फत गुरुवारी दुपारी खैरानी मार्गावर मॅनहोलवर संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू होते. प्राथमिक पाहणीत संबंधित कंत्राटदाराने आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याचे निदर्शनास आले आहे.
या दुर्घटनेत असलम इसाक शेख (वय ५५ वर्षे) हे मोबाईलवर बोलत पायी जात असताना मॅनहोलजवळ आले. कामगारांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांचा तोल जाऊन ते उघड्या मॅनहोलमध्ये पडले. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई अग्निशमन दलाच्या पथकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर आयुक्त अश्विनी भिडे यांनी 'एल' विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर, सहायक/दुय्यम अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजीत चौगुले आणि सहायक अभियंता (मलनिस्सारण प्रचालन) उत्तम पाटील यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
याशिवाय सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. समितीत उपआयुक्त (सामान्य प्रशासन), उपआयुक्त (परिमंडळ-७) आणि उपआयुक्त (पायाभूत सुविधा) यांचा समावेश असून, समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी मॅनहोलवरील कामादरम्यान चारही बाजूंनी सुरक्षारोधक (Barricades) उभारणे बंधनकारक करण्याचे निर्देश प्रशासनाने पुन्हा दिले आहेत. तसेच पुढील आठ दिवसांत मुंबईतील सर्व मॅनहोलची शंभर टक्के तपासणी करून त्यांच्या सुरक्षिततेचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व अतिरिक्त आयुक्त, सातही परिमंडळांचे उपआयुक्त आणि २६ प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेतील मृत असलम इसाक शेख यांच्या कुटुंबीयांना बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून मार्च २०२६ पासून शहरातील सर्व मॅनहोलवर संरक्षक जाळी बसविण्याच्या आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या होत्या. मात्र या प्रकरणातील निष्काळजीपणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1