ढगफुटीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा इगतपुरी-त्र्यंबकेश्वर दौरा; यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात ७ जुलै रोजी ढगफुटीची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेत आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
नाशिक ब्यूरो
नाशिक | ६ जुलै २०२६ : भारतीय हवामान विभागाने ७ जुलै रोजी नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीसदृश अतिवृष्टीची शक्यता वर्तवल्यानंतर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाला तातडीने सतर्क राहण्याचे आणि सर्व आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंत्री गिरीश महाजन हे मुंबईहून रात्रीच नाशिककडे रवाना झाले.
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात संभाव्य अतिवृष्टीमुळे पाणी साचणाऱ्या भागांची, निचऱ्याच्या कामांची तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित विभागांकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही हयगय होऊ नये, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन धोकादायक भागातील काही नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत असून त्याबाबतची माहितीही मंत्री महाजन यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. तसेच मुंबई–नाशिक महामार्गावर पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी इगतपुरी नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली.
इगतपुरी येथे तहसीलदार अभिजीत बारवकर, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगराध्यक्ष तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यानंतर त्र्यंबकेश्वर येथे मंत्री महाजन यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांच्यासह विविध भागांची पाहणी केली. संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी तहसीलदार गणेश जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, स्थानिक पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्था सतर्क असून नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0