हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरात; पाणीपुरवठ्याचा बोजवारा, नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिकांचा संताप

त्र्यंबकेश्वर शहरात आंबोली धरणाच्या पाईपलाईनमधील गळती आणि वारंवार होणाऱ्या वीज खंडितामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. हजारो वारकरी शहरात दाखल असतानाही नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिक आणि भाविकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Jun 28, 2026 - 17:44
 0  21
हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरात; पाणीपुरवठ्याचा बोजवारा, नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिकांचा संताप
त्र्यंबकेश्वर बातमी, त्र्यंबकेश्वर पाणीपुरवठा, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद

नाशिक ब्यूरो 

नाशिक | श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हजारो वारकरी दाखल झाले असतानाच शहरातील पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. आंबोली धरण येथील पाईपलाईनमध्ये गळती झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. परिणामी नागरिकांसह भाविकांनाही मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

नगरपरिषद प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार शहरातील विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, नागरिकांच्या मते हा प्रकार नवीन नसून वारंवार घडत आहे. नियमित पाणीपुरवठ्याऐवजी सततच्या तांत्रिक अडचणी आणि अपुऱ्या नियोजनामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.

शहरात एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाण्याच्या टाक्या वेळेवर भरल्या जात नाहीत. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा उशिरा होतो किंवा पूर्णपणे विस्कळीत होतो. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून नगरपरिषदेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

विशेष म्हणजे, उद्या विश्वगुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचा रथ पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याने हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरात दाखल झाले आहेत. अशा वेळी शहरात अखंड व सुरळीत पाणीपुरवठा होणे अत्यंत आवश्यक असताना प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी स्पष्टपणे समोर आल्या आहेत. भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

नागरिकांचा आरोप आहे की, नगरपरिषदेतील अनेक वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याने शहरातील दैनंदिन समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. समस्या निर्माण झाल्यानंतर केवळ सूचना जारी करून जबाबदारी झटकण्याचे काम सुरू असल्याची टीका नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन वीज व पाणीपुरवठ्याचे प्रभावी नियोजन करावे, पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे आणि वारकरी तसेच शहरवासीयांना कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0