आषाढीवारी सोहळ्याच्या नियोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे : सीईओ ओमकार पवार

संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकरी व भाविकांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिले. पालखी मार्गावरील स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि कचरा व्यवस्थापनाचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

Jun 26, 2026 - 01:06
 0  20
आषाढीवारी सोहळ्याच्या नियोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे : सीईओ ओमकार पवार
आषाढीवारी, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी, ओमकार पवार, नाशिक जिल्हा परिषद,

नाशिक ब्यूरो :

नाशिक : संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकरी बांधव आणि भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचना जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिल्या.

आषाढी पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पालखी मार्गावरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सुविधांबाबत सविस्तर आढावा घेतला.

वारकरी आणि भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. निर्मलवारी उपक्रम प्रभावीपणे राबवून पालखी मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला.

तसेच पिण्याच्या पाण्याचा नियमित व शुद्ध पुरवठा, तात्पुरत्या स्वच्छतागृहांची उभारणी, कचरा संकलन आणि त्याची योग्य विल्हेवाट याबाबत नियोजनबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटविणे तसेच नाशिक पंचायत समितीसमोरील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

आरोग्य विभागाने आवश्यक औषधसाठा, वैद्यकीय पथके आणि आपत्कालीन आरोग्य सेवा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देश देतानाच पालखी मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिले.

या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग) दिपक पाटील, निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल साळुंके, पालखी सोहळा प्रमुख मनोजकुमार राठी, निर्मलवारीचे प्रतिनिधी सुजित जाजू, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र महाजन, पंचायत समिती नाशिकच्या गटविकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे, पंचायत समिती त्र्यंबकेश्वरचे गटविकास अधिकारी रविकांत सानप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे डॉ. चैतन्य बैरागी तसेच नाशिक महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, सिन्नर नगरपरिषद प्रतिनिधी आणि पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींचे सरपंच व अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत करण्यात येणाऱ्या तयारीची माहिती दिली. संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी पालखी सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0