त्र्यंबकेश्वर मंदिरातील ६५ फूट खोल अमृतकुंडाची स्वच्छता; तळाशी शिवपिंडीचे दुर्मिळ दर्शन
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील ६५ फूट खोल अमृतकुंड भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत स्वच्छ करण्यात आले. अनेक वर्षांनंतर कुंडातील पाणी पूर्णपणे उपसल्यानंतर तळाशी असलेल्या शिवपिंडीचे दुर्मिळ दर्शन झाले.
नाशिक ब्यूरो
त्र्यंबकेश्वर (नाशिक) : आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरातील ऐतिहासिक अमृतकुंड भारतीय पुरातत्त्व विभागाच्या संवर्धन उपक्रमांतर्गत पूर्णपणे स्वच्छ करण्यात आले. कुंडातील संपूर्ण पाणी उपसल्यानंतर तळाशी असलेल्या छोटेखानी शिवपिंडीचे दुर्मिळ दर्शन झाल्याने उपस्थितांना आध्यात्मिक अनुभव मिळाला.
स्वच्छता मोहिमेदरम्यान भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्री. कृष्णमूर्ती आणि त्यांचे सहकारी तसेच श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले उपस्थित होते.
मंदिराच्या इतिहासानुसार पेशवेकाळात त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारावेळी अमृतकुंडाची दगडी बांधणी करण्यात आली होती. हे कुंड सुमारे ६५ फूट खोल असून त्याची रचना अत्यंत कलात्मक पद्धतीने करण्यात आली आहे. कुंडात उतरण्यासाठी दगडी पायऱ्यांचीही व्यवस्था आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना येथे प्रवेश दिला जात नाही.
अमृतकुंडातील पवित्र पाणी भगवान श्री त्र्यंबकेश्वरांच्या नित्य पूजा व अभिषेकासाठी वापरले जाते. धार्मिक परंपरेनुसार मंदिराच्या उंचीइतकीच तीर्थकुंडाची खोली असावी, अशी वास्तुशास्त्रीय संकल्पना मानली जाते. त्र्यंबकेश्वर मंदिराची उंची सुमारे ६५ फूट असून त्यानुसारच अमृतकुंडाची खोली असल्याचे सांगितले जाते.
दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर हे कुंड पूर्ण भरते. अनेक वर्षांनंतर या कुंडाची स्वच्छता करण्यात आल्याने त्याच्या तळाशी असलेली शिवपिंडी प्रथमच स्पष्टपणे दिसून आली. त्यामुळे ही घटना धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0