जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नाशिकमध्ये जनजागृती सायकल रॅली; ‘नशामुक्त समाज’ घडविण्याचा निर्धार
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नाशिक पोलीस आयुक्तालय आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सुमारे १२५ सायकलस्वारांनी सहभाग घेत अंमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश दिला.
नाशिक ब्यूरो
नाशिक : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित जनजागृती सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे १२५ सायकलस्वारांनी या रॅलीत सहभाग घेत अंमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश शहरभर पोहोचविला.
रॅलीचे उद्घाटन पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भडांगे तसेच नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष अमित नारायण घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
रॅलीनंतर नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी "अंमली पदार्थांची नशा... आयुष्याची दुर्दशा" या विषयावर प्रभावी प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात मोहन देसाई, डॉ. मनीषा रौदळ, साधना दुसाने, माधुरी गडाख आणि सीमा घुगे यांनी प्रभावी भूमिका साकारत अंमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम उपस्थितांसमोर मांडले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांनी "नशामुक्त समाज घडविण्याची" शपथ घेत स्वतः अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा आणि इतरांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी जागरूक करण्याचा संकल्प केला.
या उपक्रमात नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे उपाध्यक्ष दविंदर सिंग भेला, संचालक अश्विनी कोंडेकर, कारभारी भोर, सुरेश डोंगरे, शुभम भालेराव तसेच संस्थेचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करून निरोगी, सुरक्षित आणि व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
– अमित नारायण घुगे
अध्यक्ष, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1